गोवा। हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) यंदाच्या हंगामात शुक्रवारी (२७ जानेवारी) हैदराबाद एफसीसमोर ओदिशा एफसीचे आव्हान आहे. या लढतीत आठव्या हंगामात सर्वाधिक गोल करणारा नायजेरियाचा स्टार फुटबॉलपटू बार्थोलोमेव ऑग्बेचे केंद्रस्थानी आहे.
हैदराबादने १२ सामन्यांतून २० गुणांसह अव्वल स्थान राखले आहे. मागील लढतीत तळातील एससी ईस्ट बंगालवर ४-० अशी मोठ्या फरकाने मात करताना हैदराबादने तीन ‘विनलेस’ सामन्यांची मालिका खंडित केली. बुधवारच्या सामन्यांत चेन्नईयन एफसीने बंगलोर एफसीवर विजय मिळवला तरी हैदराबादचे अव्वल स्थान अबाधित राहिले.
ईस्ट बंगालवरील मोठ्या विजयात ऑग्बेचे याची हॅटट्रिक निर्णायक ठरली. या विजयाने हैदराबाद एफसीचे अव्वल स्थान कायम राखले. शिवाय ऑग्बेचे याची आठव्या हंगामातील वैयक्तिक गोलसंख्या १२वर गेली. त्यामुळे जबरदस्त खेळणाऱ्या या स्टार खेळाडूने सर्वाधिक गोलांसाठी दिल्या जाणाऱ्या ‘गोल्डन बुट’साठी प्रबळ दावेदारी पेश केली आहे. या विक्रमासह आयएसएलमधील गोलांचे ‘अर्धशतक’ही ऑग्बेचे याच्या आवाक्यात आहे. त्याच्या नावावर आजवर ४८ गोल आहेत.
ओदिशा एफसीची मागील चार सामन्यांतील कामगिरी संमिश्र आहे. दोन विजय मिळवताना एक बरोबरीसह केरला ब्लास्टर्सविरुद्धच्या पराभवाचा समावेश आहे. ओदिशाचे डझनभर सामन्यांतून १७ गुण आहेत. आणखी एका विजय मिळवल्यास ते असलेल्या हैदराबादच्या ‘टॉप’च्या स्थानाला आव्हान देऊ शकतील. मात्र, मागील सामन्यात त्यांना त्यांच्यापेक्षा खालचे स्थान असलेल्या एटीके मोहन बागानविरुद्ध गोलशून्य बरोबरीत समाधान मानावे लागले. हैदराबादविरुद्ध फॉर्मात असलेल्या ऑग्बेचेसमोर ओदिशाची कसोटी लागेल.
आक्रमक खेळासाठी हैदराबाद प्रसिद्ध आहे. त्यांचे कोचही अनुभवी आहेत. मात्र, आम्ही आमची बलस्थाने वापरून प्रतिस्पर्ध्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. आणखी एक विजय आमचे पॉइंट्स टेबलमधील स्थान तसेच आत्मविश्वास उंचावणारा ठरेल, असे ओदिशाचे हंगामी प्रशिक्षक किनो गॅर्सिया यांनी म्हटले आहे.
१२ सामन्यांत केवळ दोन पराभव पाहिल्याने हैदराबादचे ‘प्ले-ऑफ’ फेरीतील स्थान निश्चित वाटते. ओदिशा एफसीविरुद्ध सातत्य राखताना पूर्ण तीन गुण वसूल करू, असा विश्वास मुख्य प्रशिक्षक मॅनोलो मार्केझ यांना वाटतो. एससी ईस्ट बंगालविरुद्धच्या विजयात केवळ ऑग्बेचे चमकला नाही तर बचावफळीनेही सुरेख खेळ केला. आशीष राय आणि अनिकेत जाधव यांनीही छाप पाडल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
आठव्या हंगामातील पहिल्या सामन्यात हैदराबादने ओदिशाचा ६-१ असा धुव्वा उडवला. सध्याचे अव्वल स्थान पाहता हैदराबादचे पारडे जड आहे. मात्र, पहिल्या सात संघांचे गुण पाहिल्यास केवळ एक-दोन गुणांचा फरक आहे. त्यामुळे प्रतिस्पर्ध्याला कमी लेखण्याची चूक करणार नाही, असे मार्केझ यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या –
आयएसएल: पुन्हा एकदा नॉर्थ ईस्ट युनायटेड सरस; गतविजेत्या मुंबई सिटी एफसीला पुन्हा रोखले बरोबरीत
चेन्नईयन एफसीचे मिशन ‘अव्वलस्थान’; बेंगलोरला नमवण्यासाठी आखलीय खास रणनीती