गोवा (३ जानेवारी): हिरो इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) मंगळवारच्या (४ जानेवारी) सामन्यात बेंगलोर एफसी तळातील एससी ईस्ट बंगालशी दोन हात करेल. बाम्बोलिन येथील ऍथलेटिक्स स्टेडियमवर होणाऱ्या लढतीत तुलनेत कमकुवत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखताना माजी विजेते पॉइंट्स टेबलमधील गुणसंख्या दोन आकडी (डबल फिगर) करण्याचा प्रयत्न करतील.
बेंगलोरच्या खात्यात ९ सामन्यांतून तितकेच गुण असले तरी गतसामन्यांतील चेन्नईयन एफसीविरुद्धच्या (४-२) मोठ्या विजयाने त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. या विजयासह त्यांनी ७ ‘विनलेस’ सामन्यांची मालिका खंडित केली. मार्को पेझाइओली यांच्या प्रशिक्षकपदाखालील बेंगलोरने सातत्य राखल्यास गुणसंख्या ‘डबल फिगर’ होईल. तसे झाल्यास माजी विजेत्यांना अंतिम चार संघांत स्थान मिळवण्या दृष्टीने दावेदारी पेश करता येईल.
क्लीटन सिल्वाचा उंचावलेला खेळ तसेच उदंता सिंग आणि आशिक कुरुनियानची त्याला लाभलेली साथ पाहता चेन्नईयनविरुद्ध लौकिकाला साजेसा खेळ करण्यात बेंगलोरला यश आले. वरील त्रिकुटासह पराग श्रीवास, रोशन नाओरेम, अजित कामराज यांनीही प्रभाव पाडला. प्रत्येक खेळाडूमध्ये विजयासाठीचे प्रयत्न दिसून आले. ‘चेन्नईयन एफसीविरुद्धच्या विजयाने आम्हाला वेगळी उर्जा मिळाली आहे. खेळाडूंचे मनोबल उंचावले आहे. एससी ईस्ट बंगालकडे एक चांगला संघ म्हणून आम्ही पाहतो. त्यांना नवे प्रशिक्षक मिळाले आहेत. मात्र, त्यांची आठव्या हंगामातील कामगिरी फारशी चांगली नाही. त्याचा फायदा उठवत तीन गुण वसूल करण्याला आमचे प्राधान्य असेल’, असे बेंगलोरच्या प्रशिक्षक पेझाइओली यांनी चेन्नईयनविरुद्धच्या लढतीच्या पूर्वसंध्येला सांगितले.
एससी ईस्ट बंगालने यंदाच्या हंगामात चाहत्यांची पुरती निराशा केली आहे. ८ सामन्यानंतरही त्यांना पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. इतके सामने खेळून विजय न मिळवलेला आठव्या हंगामातील तो एकमेव क्लब आहे. ४ गुणांसह गुणतालिकेत तळाला असलेल्या ईस्ट बंगालसाठी थोडी आशादायी बाब म्हणजे त्यांनी मागील तीन सामन्यांत दोन प्रतिस्पर्धी संघांना बरोबरीत रोखले. दुसऱ्या स्थानी असलेल्या हैदराबाद एफसीपूर्वी त्यांनी केरळा ब्लास्टर्सला प्रत्येकी एक गुणांवर समाधान मानायला लावले.
नियोजित प्रशिक्षक जोस मॅन्युअल डियाझ यांनी क्लब सोडल्यानंतर हंगामी प्रशिक्षक म्हणून रेनेडी सिंग यांच्याकडे ईस्ट बंगालची जबाबदारी आली आहे. वास्तविक पाहता नवे प्रशिक्षक म्हणून स्पेनचे मारिओ रिवेरा यांची नियुक्ती झाली आहे. मात्र, मंगळवारच्या सामन्यासाठी ते उपलब्ध नाहीत. भारताचे माजी कर्णधार असलेल्या रेनेडी सिंग यांच्यासमोर खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावण्याचे मोठे आव्हान असेल. ‘प्रत्येक संघ प्रत्येक सामन्यात चमकदार कामगिरीसाठी उत्सुक असतो. परंतु, या हंगामात ईस्ट बंगालचा खेळ ढेपाळला आहे. आपला संघ तळाला असावा, असे कुठल्याही कोचला वाटत नाही. मात्र, उर्वरित स्पर्धेत आम्ही चांगला खेळ करू’, असा विश्वास रेनेडी सिंग यांनी व्यक्त केला आहे.
ईस्ट बंगालला बेंगलोरविरुद्ध अँटोनिओ पेरोसेविक विना खेळावे लागेल. एका सामन्याच्या बंदीमुळे तो या लढतीला मुकला आहे. डॅनियल चिमा चुकवु याने चांगला खेळ केला आहे. त्याच्यासह अन्य खेळाडूंवर ईस्ट बंगालची भिस्त आहे.