---Advertisement---

ISL 2018: बाद फेरीसाठीची चुरस वाढल्याने आयएसएल रंगतदार टप्यात

---Advertisement---

हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) चौथ्या मोसमात सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली पदार्पण करणारा बेंगळुरू एफसी हा बाद फेरीतील स्थान नक्की केलेला पहिला संघ बनला.

तीन सामने बाकी असतानाच बेंगळुरूने ही कामगिरी साध्य केली. 90 पैकी 71 साखळी सामने पूर्ण झाले असताना इतर तीन स्थानांसाठी मात्र चुरस कायम आहे. त्यामुळे आयएसएलने रंगतदार टप्यात प्रवेश केला आहे. पुढील तीन आठवड्यांचा कालावधी उत्तरोत्तर रोमहर्षक ठरण्याची अपेक्षा आहे.

बेंगळुरूने 15 सामन्यांतून 11 विजयांसह सर्वाधिक 33 गुण मिळवून गुणतक्त्याततील आघाडी कायम राखली आहे. एफसी पुणे सिटी दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांचे 28 गुण आहेत. एक पाय बाद फेरीत असला तरी तीन सामने बाकी असल्यामुळे पुण्याला आगेकूच गृहीत धरून चालणार नाही.

यंदा मोसमाचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यात इतक्या चुरशीने स्पर्धा पुढे सरकत आहे की किमान सहा संघांना बाद फेरीची चांगली संधी असल्याचा विश्वास वाटत आहे. बेंगळुरू एफसीशिवाय इतर तीन संघांनाच संधी मिळेल. त्यामुळे स्पर्धेच्या निर्णायक टप्यासाठी हे संघ सज्ज होत आहेत.

मुंबई सिटीला रविवारी महाराष्ट्र डर्बीत एफसी पुणे सिटीने 2-0 असे हरविले. यामुळे मुंबईच्या वाटचालीला खीळ बसला. मुंबईचे प्रशिक्षक अलेक्झांड्रे गुईमाराएस यांनी सांगितले की, आम्हाला अजूनही 12 गुणांसाठी लढण्याची संधी आहे. उरलेले चार सामने जिंकले तर वाटचाल शक्य असेल.

आता आम्हाला सर्वोत्तम खेळ कराण्यासाठी, चुका टाळण्यासाठी विचार करावा लागेल. आता बरोबरी सुद्धा आम्हाला परवडणार नाही. या विजयासह पुणे सिटीचे 28 गुण झाले. त्यांचा दुसरा क्रमांक आहे.  2014 मध्ये आयएसएलला प्रारंभ झाल्यापासून पुण्याला एकदाही बाद फेरी गाठता आलेली नाही.

एरवी इतके गुण पुणे सिटीचे स्वप्न साकार करण्यासाठी पुरेसे ठरले असते, पण जमशेदपूर एफसी (25 गुण), चेन्नईयीन एफसी (24), केरळा ब्लास्टर्स (21) आणि एफसी गोवा (20) असे चार संघ पुणे सिटीचा पाठलाग करीत आहेत. त्यामुळे पुणे सिटीला गुणतक्त्यावरील नजर दुसरीकडे फिरवून चालणार नाही.

पुणे सिटीसाठी पुढील दोन सामने महत्त्वाचे असतील. आधी 16 फेब्रुवारी रोजी त्यांची बेंगळुरूशी लढत होईल. त्यानंतर 25 तारखेला ते गोव्याविरुद्ध आमनेसामने येतील. त्यांचा शेवटचा सामना दिल्लीमध्ये दिल्ली डायनॅमोजविरुद्ध आहे.

दिल्लीचा संघ तळात असला तरी त्यांनी बेंगळरूला पराभवाचा धक्का दिला आहे, तर चेन्नईला बरोबरीत रोखले आहे. विशेष म्हणजे पुणे सिटीला सुद्धा दिल्लीविरुद्ध पराभूत व्हावे लागले आहे. 22 नोव्हेंबर रोजी मोसमातील सलामीच्या लढतीत पुणे सिटीला घरच्या मैदानावर अपयश आले होते.

चेन्नईच्या वाटचालीत रविवारी दिल्लीविरुद्धच्या बरोबरीमुळे अडथळा आला.  त्यांना तीन पैकी दोन गुण गमवावे लागले. त्यामुळे त्यांना केवळ तिसऱ्या क्रमांकाशिवाय इतरही फटका बसू शकतो. यानंतर चेन्नईचे गोवा, जमशेदपूर आणि ब्लास्टर्स यांच्याविरुद्ध महत्त्वाचे सामने आहेत.

चेन्नईचे प्रशिक्षक जॉन ग्रेगरी म्हणाले की, आमचे गोवा व जमशेदपूरविरुद्धचे पुढील दोन सामने बाद फेरीच्यादृष्टिने थेट प्रतिस्पर्ध्यांशी आहेत. प्रमुख संघांच्या तुलनेत आमच्या हातात एक सामना शिल्लक आहे. त्यामुळे आमचे आव्हान अजूनही आमच्या हातात आहे. उर्वरीत मोसमात कोणत्या गोष्टी घडतात, आम्हाला बाद फेरीत प्रवेश मिळतो की नाही यावर आम्ही नियंत्रण ठेवू शकतो. या पार्श्वभूमीवर मी अजूनही आनंदी व्यक्ती आहे.

त्यांच्यासारखीच भावना असलेली आणखी एक व्यक्ती म्हणजे स्टीव कॉप्पेल. ते शांतचित्ताने सक्रीय असून पदार्पण करणाऱ्या जमशेदपूर एफसीला बाद फेरीच्या जवळ घेऊन गेले आहेत. मोसमात प्रारंभी सलग तीन बरोबरी पत्करलेल्या संघाने नंतर अप्रतिम खेळाच्या जोरावर पारडे फिरविले आहे. गेल्या सहा सामन्यांत पाच विजय अशी भक्कम कामगिरी करीत त्यांनी चित्र पालटले आहे, पण त्यांचे उरलेले तिन्ही सामने अवघड आहेत. चेन्नई, बेंगळुरू व गोवा यांच्याविरुद्ध त्यांना खेळायचे आहे. यात दोन सामने जिंकले तर त्यांची मोहीम फत्ते झालेली असेल. यातील शेवटचे दोन सामने घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा त्यांना मिळेल.

गोव्याने मोसमाच्या प्रारंभी जोरदार कामगिरी करीत संभाव्य विजेत्यांच्या शर्यतीत आघाडी घेतली होती, पण नंतर काहीतरी बिघडले. सर्जिओ लॉबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या या संघाची वाटचाल विस्कळीत झाली. त्यामुळे त्यांनी आपला मार्ग अवघड करून ठेवला आहे. गेल्या तीन सामन्यांत त्यांना केवळ एकच गुण मिळविता आला आहे. त्यांना प्रारंभीच्या तुलनेत आता कमकुवत बचावाचा फटका बसण्यास सुरवात झाली आहे.

गोव्यासाठी मोसम कसा पुढे सरकरणार हे प्रामुख्याने पुढील सामन्यावर अवलंबून असेल. 16 फेब्रुवारी रोजी त्यांची घरच्या मैदानावर चेन्नईशी लढत होत आहे. या निकालामुळे गोव्यासह चेन्नईसाठी सुद्धा बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. गोव्याचे स्थान काय असेल, चेन्नईचे काय होणार, इतर संघांना जीवदान मिळणार का, अशा गोष्टी या निकालानंतर स्पष्ट होतील.

या पार्श्वभूमीवर पुढील काही फेऱ्यांची उत्कंठा कमालीची वाढली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment