पुणे: एफसी पुणे सिटीने हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) घरच्या मैदानावरही अखेर धडाकेबाज खेळ केला. शनिवारी पुण्याने नॉर्थईस्ट युनायटेड एफसीचा तब्बल पाच गोलांनी धुव्वा उडविला. कर्णधार मार्सेलीनीयोची हॅट्रिक वैशिष्ट्य ठरली. याशिवाय तरुण स्ट्रायकर आशिक कुरनियान आणि आदिल खान यांनी प्रत्येकी एका गोलची भर घातली.
पुण्याचा संघ मुख्य प्रशिक्षक रँको पोपोविच यांच्या गैरहजेरीत मैदानावर उतरला होता. ते स्टेडीयममध्ये व्हीआयपी स्टँडमध्ये बसले होते. त्यांच्या गैरहजेरीत सहाय्यक प्रशिक्षक व्लादीचा ग्रुजीच यांच्याकडे सुत्रे होती. त्यामुळे हा विजय पुण्यासाठी बहुमोल ठरला.
या विजयाबरोबरच पुण्याने गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. आठ सामन्यांत पुण्याने पाचवा विजय मिळविला. पुण्याचे 15 गुण झाले. याआधी पुण्याने घरच्या मैदानावर तीन पैकी दोन सामने गमावले होते. त्यामुळे हा विजय आठ हजार 762 प्रेक्षकांना जल्लोषाची पर्वणी देणारा ठरला.
चेन्नईयीन एफसी 16 गुणांसह आघा़डीवर आहे. पुण्याने मुंबई सिटी एफसी (13 गुण), एफसी गोवा (12) व बेंगळूरु एफसी (12) यांना मागे टाकत तीन क्रमांक प्रगती केली. नॉर्थईस्टला सात सामन्यांत पाचवा पराभव पत्करावा लागला. चार गुणांसह हा संघ शेवटून दुसऱ्या म्हणजे नवव्या स्थानावर आहे.
पुण्याचा पहिला गोल प्रतिआक्रमणाचे आदर्श उदाहरण होता. नॉर्थईस्टच्या मार्सिनीयोचे आक्रमण पुण्याने परतावून लावले होते. मग काही सेकंदांमध्ये डावीकडून जोनाथन ल्युकाने घोडदौड केली. त्याने एमिलीयानो अल्फारो याला पास दिला. अल्फारोने कुरनियान याच्याकडे चेंडू सोपविला. कुरुनियानने मग अप्रतिम किक मारत नॉर्थईस्टचा गोलरक्षक टीपी रेहेनेश याला चकविले.
पुण्याचा दुसरा गोल स्वप्नवत होता. 26व्या मिनिटाला रॉलीन बोर्जेसने मार्सेलीनीयोला मागून पाडले. हे बॉक्सच्या बाहेर, पण अगदी जवळ घडले. त्यामुळे पंचांनी पुण्याला फ्री-किक दिली. त्यावर मार्सेलीनीयोने डाव्या पायाने चेंडू हवेतून भिरभिरत मारला. हा चेंडू खेळाडूंच्या भिंतीवरून गेला.
रेहेनेशला झेप टाकूनही गोल रोखता आला नाही. या गोलनंतर निलंबीत प्रशिक्षक रँको पोपोविच यांच्यासह फ्रँचायजीच्या प्रमुखांनी एकच जल्लोष केला. सेट-पीसेसमधील आदर्श उदाहरण म्हणून या गोलचे कौतूक झाले.
पूर्वार्धाच्या भरपाई वेळेत जोनाथनने मुसंडी मारली. त्याने मार्सेलीनीयोला सुंदर पास दिला. मार्सेलीनीयोने जितका अचूक फटका मारला तितकाच चुकीचा बचाव रेहेनेशने केला. चेंडू आधी त्याच्या हातातून आणि मग पायांमधून नेटमध्ये जाणे नॉर्थईस्टसाठी धक्कादायक ठरले. मध्यंतरास पुण्याकडे 3-0 अशी आघाडी होती.
उत्तरार्धातही पुण्याने अथक आक्रमण केले. चार मिनिटे बाकी असताना मार्सीलीनीयोला मार्कोस टेबारने अफलातून पास दिला. त्यावर मार्सेलीनीयोने रेहेनेशला चकवित हॅट्रिक साजरी केली. त्यानंतर जर्सी काढून जल्लोष केल्याबद्दल त्याला पिवळ्या कार्डला सामोरे जावे लागले.
मग लगेच त्याच्याऐवजी रॉबर्टीनो पुग्लीयारा याला बदली खेळाडू म्हणून मैदानावर उतरविण्यात आले. हा बदल अचूक आणि फलदायी ठरला. उजव्या बाजूने मुसंडी मारत रॉबर्टीनो याने चेंडू नेटसमोर मारला. तेथे धुमश्चक्री झाली आणि आदिल खानने संधी साधली.