गोवा (३ मार्च) : आयएसएल अर्थात हिरो इंडियन सुपर लीगची उपांत्य फेरी निश्चित केलेल्या जमशेदपूर एफसीने तळातील ओदिशा एफसीला हरवून आठव्या हंगामात सलग पाचवा विजय विजय नोंदवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. बाम्बोलिन येथील अॅथलेटिक्स स्टेडियमवर शुक्रवारी (४ मार्च) उभय संघ आमनेसामने आहेत.
फॉर्मात असलेल्या जमशेदपूरने मागील लढती हैदराबाद एफसीवर ३-० अशी आरामात मात करताना केवळ अव्वल स्थानी झेप घेतली नाही तर १८ सामन्यांतून ३७ गुणांसह सलग दुसऱ्या हंगामातील सेमीफायनल प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. ओवेन कॉयल यांच्या प्रशिक्षकपदाखालील क्लबला सातत्य राखून गुणांची ‘चाळीशी’ पार करण्याची संधी आहे. मागील नऊपैकी आठ सामने जिंकलेल्या जमशेदपूरने यंदाच्या हंगामातील एक परिपूर्ण संघ म्हणून ओळख कायम ठेवली आहे. सेट-पीससह अधिकाधिक गोल ही त्यांची जमेची बाजू आहे. मागील सामन्यांतील तीनपैकी दोन गोल हे कॉर्नरच्या स्वरूपातील आहेत. हैदराबादविरुद्ध कर्णधार पीटर हार्टली याने महत्त्वपूर्ण गोल केला. त्याचा आठव्या हंगामातील हा तिसरा गोल आहे. ग्रेग स्टीवर्टचे सातत्य हेही जमशेदपूरच्या सांघिक कामगिरीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मात्र, रेड कार्ड मिळाल्याने तो मागील लढतीत खेळू शकला नाही.
ओदिशाला यंदाच्या हंगामात उपांत्य फेरी गाठता आली नाही तरी मागील मोसमाच्या तुलनेत त्यांची कामगिरी उंचावली आहे. त्यांनी ३० गोल चढवताना ३८ गोल खाल्लेत. मागील हंगामात त्यांनी खाल्लेल्या गोलांची संख्या ४४ होती. यंदाच्या हंगामात चारपैकी तीन सामने जिंकून आश्वासक सुरुवात केली तरी ओदिशाला सातत्य राखता आलेले नाही. ताज्या गुणतालिकेत त्यांच्या खात्यात १९ सामन्यांतून २३ गुण आहेत. मात्र, हंगामाचा शेवट गोड करून ओदिशाला थोडे वरचे स्थान मिळवण्याला वाव आहे. मात्र, जमशेदपूरसारख्या अव्वल प्रतिस्पर्ध्याविरुद्ध त्यांचा कस लागेल.