गोवा (१६ जानेवारी) हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) सोमवारच्या (१७ जानेवारी) सामन्यात जमशेदपूर एफसीसह हैदराबाद एफसी हे ‘टॉप फोर’मधील क्लब आमनेसामने आहेत. अनुक्रमे, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी असलेल्या क्लबमध्ये अव्वल स्थान मिळवण्यासाठी चुरस आहे. या लढतीतील निकालावर केरळा ब्लास्टर्सचे अव्वल स्थानही अवलंबून आहे.
मागील तीन सामन्यांत ढेपाळलेल्या हैदराबादला हरवून पॉइंट्स टेबलमध्ये टॉपचे स्थान मिळवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. ११ सामन्यांतून १९ गुणांसह दुसऱ्या स्थानी असलेल्या हैदराबाद एफसीमध्ये नायजेरियाचा स्ट्रायकर डॅनियल चिमा चुक्वु याचा समावेश झाला आहे. एससी ईस्ट बंगाल सोडून तो नव्या क्लबमध्ये दाखल झाला आहे. आधीच्या संघात चिमा याच्या नावावर दोन गोल आहेत. जमशेदपूर एफसीने लागोपाठ दोन सामने जिंकले आहेत. नॉर्थ ईस्ट युनायटेडवरील निसटत्या विजयानंतर त्यांनी मागील लढतीत ईस्ट बंगालवर मात केली. या लढतीत राखीव इशान पंडिताचा गोल निर्णायक ठरला. आर्सेनलच्या डॅनियल चिमा चुक्वुमुळे जमशेदपूरची आघाडी फळी अधिक मजबूत झाली आहे.
ग्रेग स्टीवर्टसह पंडिताचे सातत्य तसेच चिमाचा समावेशामुळे हैदराबादसारख्या मजबूत संघाविरुद्ध खेळ उंचावू, असा विश्वास जमशेदपूर एफसीच्या प्रशिक्षक ओवेन कॉयले यांनी व्यक्त केला आहे. जमशेदपूरच्या १८ गोलांपैकी ११ गोल हे सेट पीस रणनितीद्वारे आहेत. त्यांच्यासह बंगलोर एफसीला अशाप्रकारच्या रणनितीद्वारे तितकेच गोल करता आलेत. हैदराबादला मात्र, सेट पीसद्वारे ११पैकी ७ गोल करता आलेत.
हैदराबाद एफसीने ११ सामन्यांतून १७ गुणांसह गुणतालिकेत तिसरे स्थान राखले आहे. मात्र, मागील तीन सामन्यांत दोन बरोबरी आणि पराभवाला सामोरे जावे लागले. आम्ही पुन्हा विजयीपथावर परतू, असा विश्वास हैदराबादचे प्रशिक्षक मोनोलो मार्केझ यांनी व्यक्त केला आहे. मात्र, महत्त्वपूर्ण लढतीत बार्थोलोमेव ऑग्बेचे आणि जॅवियर सिव्हेरिओ यांचा खेळ निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. ऑग्बेचे हा आठव्या हंगामातील टॉप स्कोअरर आहे. जॅवियर सिव्हेरिओ हाही सर्वोत्तम खेळाडू आहे. आमच्या सर्वच प्रमुख खेळाडूंना गोल करता आलेला नाही. त्यामुळे सुरुवातीच्या प्लेइंग इलेवनमध्ये ऑग्बेचे आणि सिव्हेरिओ यांना खेळवण्याला प्राधान्य असेल, असे मार्केझ म्हणाले.
जमशेदपूर एफसी हा कडवा प्रतिस्पर्धी आहे. त्यांच्याकडे अनेक गुणवान फुटबॉलपटू आहेत. ग्रेग स्टीवर्ट चांगलाच फॉर्मात आहे. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व मिळवणे सोपे नाही. परंतु, मागील तीन सामन्यांतील चुका टाळताना सर्व आघाड्यांवर सर्वोत्कृष्ट खेळ करण्याचा प्रयत्न करू, असे हैदराबादचे प्रशिक्षक मोनोलो मार्केझ यांनी सांगितले.