---Advertisement---

आयएसएल: घरच्या मैदानावर नव्याने प्रारंभाची हैदराबादला आशा

On: शनिवार, नोव्हेंबर 2, 2019 10:35 AM
---Advertisement---

हैदराबाद। हिरो इंडियन सुपर लिगचे (आयएसएल) शनिवारी हैदराबादमध्ये आगमन होत आहे. लिगमधील या नव्या ठिकाणी खेळण्यास सर्वाधिक उत्सुक असेल तो यजमान हैदराबाद एफसी संघ. त्यांनी सलग दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे शनिवारी घरच्या मैदानावर केरला ब्लास्टर्स एफसीविरुद्ध नव्याने प्रारंभ करण्याची त्यांना आशा असेल.

जीएमसी बालयोगी स्टेडियमवर ही लढत होईल. पदार्पणात हैदराबादची सुरवात सर्वोत्तम झाली नाही. एटीके आणि जमशेदपूर एफसी यांच्याविरुद्ध ते हरले. खेळाडूंच्या दुखापती आणि निलंबनाचे प्रमाण वाढत असल्याने प्रशिक्षक फिल ब्राऊन यांच्यासमोरील आव्हान बिकट झाले आहे.

ब्राऊन यांनी सांगितले की, आम्ही कसून सराव करीत आहोत. आम्ही सर्वस्व पणास लावले आहे. आम्ही सुरवातीपासून प्रवास करीत आहोत. आता अखेर आम्ही हैदराबादमध्ये दाखल झालो. आम्ही आधी थोडा आराम केला. आता घरच्या मैदानावरील दोन सामने कसे होतात ते पाहूयात.

बोबो, गाईल्स बार्न्स, साहील पन्वर आणि रॅफेल गोमेझ अशा खेळाडूंना दुखापती झाल्या आहेत. त्यामुळे ते तंदुरुस्त होऊ शकतात का हे पाहावे लागेल. याशिवाय नेस्टर गॉर्डीलो निलंबीत आहे.

जमेची बाब म्हणजे स्टार स्ट्रायकर मार्सेलिनीयो याने आयएसएलमधील चौथ्या मोसमात खाते उघडले आहे. ब्राझीलच्या या खेळाडूचे चमकदार कौशल्य ब्राऊन यांच्यासाठी उपयुक्त ठरेल.

ब्राऊन यांनी सांगितले की, आमच्या संघात अनेकांना दुखापत झाली आहे, पण सुदैवाने मार्सेलिनीयो त्यात नाही. आमचे काही महत्त्वाचे खेळाडू स्टँडमध्ये बसून आहेत. ते परतल्यावर रॉबिन सिंगचा फायदा होईल. सर्व जण तंदुरुस्त झाले की तुम्हाला फरक दिसेल.

ब्लास्टर्सलाही काही प्रमुख खेळाडूंना मुकावे लागेल. प्रभावी मध्यरक्षक मारीओ आर्क्वेस आणि मध्यवर्ती बचावपटू संदेश झिंगन यांना दुखापत झाली आहे.

ब्लास्टर्सचे मुख्य प्रशिक्षक एल्को शात्तोरी यांनी सांगितले की, हैदराबादच्या अनेक खेळाडूंना दुखापती झाल्या आहेत. शक्य तितका भक्कम संघ नसेल तर खेळणे कधीच सोपे नसते. आमची स्थिती तेवढी वाईट नाही, पण मला सुद्धा भक्कम संघ निवडणे शक्य नाही. माझे सर्व परदेशी खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त नाहीत, पण तुम्हाला मार्ग काढून खेळावे लागते.

ब्लास्टर्सने सलामीला पिछाडीवरून एटीकेला हरवित धडाकेबाज प्रारंभ केला. त्यानंतर कोचीमध्ये मुंबई सिटी एफसीविरुद्ध त्यांना पराभूत व्हावे लागले.

नेदरलँड्सचे शात्तोरी पुढे म्हणाले की, मागील सामना हरणे आमचे दुर्दैव ठरले. तो पराभव वेदनादायक होता. आम्ही किमान एक गुण जिंकायला हवा होता. दुसरीकडे हैदराबादचा संघ जमशेदपूरमधील पराभवानंतर येथे आला आहे. त्यामुळे दोन्ही संघ तीन गुणांसाठी आतूर आहेत. सामना कमालीचा रंगतदार ठरेल अशी आशा आहे.

ब्लास्टर्सचा संघ आक्रमणात कर्णधार बार्थोलोम्यू ओगबेचे याच्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. दोन सामन्यांत आठ गोल पत्करलेल्या हैदराबादच्या बचाव फळीविरुद्ध लक्ष्य साधण्याचा आत्मविश्वास त्याला जाणवत असेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---