---Advertisement---

आयएसएल: जमशेदपूरची आज गतविजेत्या बेंगळुरूशी लढत

On: रविवार, नोव्हेंबर 3, 2019 12:00 PM
---Advertisement---

जमशेदपूर। हिरो इंडियन सुपर लिगमध्ये रविवारी जमशेदपूर एफसीसमोर गतविजेत्या बेंगळुरू एफसी संघाचे आव्हान असेल. घरच्या मैदानावर सलग तिसऱ्या विजयासह हॅट्रिक नोंदविण्याचा जमशेदपूरचा प्रयत्न असेल. जेआरडी टाटा क्रीडा संकुलात ही लढत होईल.

जमशेदपूरने ओडिशा एफसी आणि हैदराबाद एफसी यांना हरवून दोन सामन्यांत सहा गुणांसह चमकदार प्रारंभ केला आहे.

प्रशिक्षक अँटोनिओ इरीओंदो यांच्या संघाने आक्रमक शैलीचा खेळ केला आहे. त्यांनी प्रतिस्पर्ध्यासमोर थेट आव्हान निर्माण केले आहे. मध्यरक्षक पिटी याची कामगिरी निर्णायक ठरली असून त्याने परिस्थितीचे नियंत्रण केले आहे. प्रतिस्पर्ध्याचा बचाव भेदणारे पासेस देण्याची हातोटी आपल्याकडे असल्याचे त्याने दाखवून दिले आहे. त्यामुळे बेंगळुरूविरुद्ध पिटीची कामगिरी महत्त्वाची असेल.

इरीओंदो यांनी सांगितले की, गतविजेत्यांविरुद्ध खेळणे ही मोठी कसोटी आहे. त्यांचा संघ फार चांगला आहे. गुणतक्ता पाहून बेंगळुरूचे मुल्यमापन करणे मोठी चूक ठरेल. आम्ही चांगला खेळ करीत असल्यामुळे आम्हाला विजयाची संधी असेल. तुमचा स्वतःचा संघ आणि तुमचे डावपेच यावर लक्ष केंद्रीत करणे महत्त्वाचे असते.

जमशेदपूरचा स्ट्रायकर सर्जिओ कॅस्टेल याने दोन गोल करून स्पर्धेला प्रभावी प्रारंभ केला आहे. त्याची भूमिका सुद्धा महत्त्वाची असेल. केवळ परदेशी खेळाडूच नव्हे तर फारुख चौधरी, अनिकेत जाधव आणि मोबाशीर रेहमान असे भारतीय खेळाडू सुद्धा चमकले आहेत.

दुसरीकडे बेंगळुरूला दोन सामन्यांत अद्याप विजय मिळालेला नाही. त्यांची निर्णायक विजयाची प्रतिक्षा कायम आहे. त्यांना दोन्ही वेळा बरोबरी पत्करावी लागली आहे. सलामीला नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध त्यांची बरोबरी झाली. त्यानंतर एफसी गोवाच्या साथीत एका गुणावर समाधान मानावे लागणे त्यांचे दुर्दैव ठरले. तेव्हा गोव्याला अंतिम टप्यात पेनल्टी मिळाली, जी फेरॅन कोरोमीनास याने सत्कारणी लावली.

बेंगळुरूचे प्रशिक्षक कार्लेस कुआद्रात यांनी सांगितले की, गोव्याविरुद्धच्या लढतीत बरेच सकारात्मक मुद्दे आहेत. आम्ही ज्या पद्धतीने खेळलो त्याचा मला अभिमान वाटतो. कोरोमीनास याला कोणतीही संधी मिळाली नव्हती. आमच्या बचाव फळीने परिस्थितीचा चांगला अंदाज घेतला आणि त्याला गोल करण्यापासून रोखले. आम्ही चार गुण गमावले आहेत, पण आम्हाला मनोधैर्य भक्कम ठेवावे लागेल. जमशेदपूरविरुद आम्हाला भक्कम खेळ करावा लागेल.

बेंगळुरूविरुद्ध जमशेदपूरचा संघ चेंडूवर ताबा ठेवून वर्चस्व राखणार की प्रतिआक्रमण रचणार याचा निर्णय इरीओंदो यांना घ्यावा लागेल. दोन सामन्यांतील खेळ पाहिला तर त्यांना दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीचा अवलंब सहज करता येईल.

या पार्श्वभूमीवर कागदावर भक्कम वाटणाऱ्या दोन संघांमधील ही लढत रंगतदार होण्याची अपेक्षा आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---