कोची। हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) शुक्रवारी केरला ब्लास्टर्स एफसीसमोर ओडिशा एफसीचे आव्हान असेल. नेहरू स्टेडियमवरील लढतीत ब्लास्टर्सचे आव्हान पणास लागलेले असेल. कामगिरीतील घसरण रोखण्याचे आव्हान त्यांच्यामोर असेल.
ब्लास्टर्सने मोसमाच्या प्रारंभी कट्टर प्रतिस्पर्धी एटीकेला हरविले. या अभिमानास्पद विजयानंतर ब्लास्टर्सचा मार्ग भरकटला आहे. मुंबई सिटी एफसी आणि हैदराबाद एफसी यांच्याविरुद्ध त्यांना पाठोपाठ पराभव पत्करावे लागले. आता घरच्या मैदानावर संघ विजयी मार्गावर परतावा म्हणून प्रशिक्षक एल्को शात्तोरी यांना दमदार डावपेच आखावे लागतील.
गत मोसमात सलामीला एटीकेला हरविल्यानंतर ब्लास्टर्सला 14 सामन्यांत विजयाने हुलकावणी दिली होती. या कटू स्मृती अजूनही ताज्या आहेत. शात्तोरी यांच्या संघाला अशा कामगिरीची पुनरावृत्ती परवडणार नाही आणि त्यांना विजयाची नितांत गरज आहे.
दुसरीकडे ओडिशाचा फॉर्म ब्लास्टर्सच्या विरुद्ध आहे. मोसमाच्या सुरवातीला दोन पराभव झाल्यानंतर त्यांनी मुंबई सिटीवर 4-2 अशी मात केली. त्यामुळे या सामन्यापूर्वी त्यांचे मनोधैर्य उंचावलेले आहे.
आता दुखापतींनी ग्रासलेल्या ब्लास्टर्सविरुद्ध फायदा उठवित कामगिरी उंचावण्यासाठी ते प्रयत्नशील असतील. मारीओ आर्क्वेस आणि जियान्नी झुईवर्लून हे तंदुरुस्त होण्याची शक्यता कमी आहे, तर संदेश झिंगान पूर्ण मोसमासाठी मुकणार असल्याचे त्यापूर्वीच जाहीर झाले आहे.
शात्तोरी यांनी सांगितले की, आम्ही मागील सामना मानसिक पातळीवर जिंकायला हवा होता. हैदराबादच्या संघात फक्त तीन परदेशी खेळाडू होते. आम्हाला चांगल्या संधी मिळाल्या होत्या. मी आमच्या तीन सामन्यांचा आढावा घेतला. आम्ही 43 क्रॉस पास दिले. यातील किती परिणामकारक ठरले हा वेगळा प्रश्न आहे. आमचे विंगर्स स्थिरावलेले नाहीत, तर मध्य फळीत एका महत्त्वाच्या खेळाडूची उणीव जाणवते आहे. मागील सामन्यात आम्ही बचावात झुईवर्लून याला गमावले. या घडीला आव्हान राखणे हेच सर्वाधिक महत्त्वाचे ठरले आहे.
ब्लास्टर्ससाठी सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे स्टार स्ट्रायकर बार्थोलोम्यू ओगबेचे याच्यासाठी त्यांना गोलच्या फारशा संधी निर्माण करता आलेल्या नाहीत. साहल अब्दुल समद याच्यासारखे खेळाडू शात्तोरी यांच्या शैलीशी अजूनही जुळवून घेत आहेत.
नेदरलँड्सचे शात्तोरी म्हणाले की, आमची पद्धत पासिंग फुटबॉलची आहे. त्यासाठी थोडा वेळ लागतो. मागील सामन्यात साहलने चुक केली, पण आम्ही त्याच्यामुळे हरलो नाही. मी साहलबरोबरच चर्चा केली. मी या खेळाडूबद्दल फार समाधानी आहे.
ओदीशासमोर या क्षेत्रात काही समस्या असू शकतील. झिस्को हर्नांडेझ हा जोसेप गोम्बाऊ यांच्या संघासाठी अप्रतिम प्लेमेकर ठरला आहे. ऍरीडेन सँटाना आणि जेरी माहमिंगथांगा यांच्याबरोबरील त्याची भागिदारी आश्वासक वाटते आहे. नंदकुमार शेखरच्या वेगाची त्यास साथ मिळाली तर ब्लास्टर्सच्या बचाव फळीसमोर कडवी कसोटी निर्माण झालेली असेल.
गोम्बाऊ यांना आत्मविश्वास वाटत आहे. त्यांनी सांगितले की, मागील मोसमात आम्ही बऱ्याच संधी गमावल्या. यावेळी आम्ही तीन सामन्यांत सहा गोल केले आहेत. तीन लढतींनंतर ही कामगिरी दुसऱ्या क्रमांकाची आहे. आमच्याकडे भारतातील बरेच गुणवान खेळाडू आहेत. आम्ही भक्कम मनोधैर्यासह येथे आलो आहोत आणि तीन गुण मिळवू शकतो अशी आम्हाला संपूर्ण खात्री आहे.
ओ़डिशाचा बचाव सुद्धा कडेकोट नाही. त्यांना क्लीनशीट राखता आलेली नाही. तीन सामन्यांत त्यांच्याविरुद्ध सहा गोल झाले आहेत. शेवटच्या दहा मिनिटांत त्यांच्याविरुद्ध गोल होतात असे दिसून आले आहे. तिन्ही सामन्यांत हेच घडले आहे. ब्लास्टर्स या कमकुवत दुव्याचा फायदा उठविणार का आणि आपली घसरण रोखणार का याची उत्सुकता आहे. विजय मिळविणे दोन्ही संघांसाठी आंतरराष्ट्रीय ब्रेकपूर्वी मनोधैर्याच्यादृष्टिने अत्यंत महत्त्वाचे ठरेल.