ओदिशासमोर मुंबई सिटी एफसीचे आव्हान
गोवा, २ जानेवारी : हिरो इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) पहिल्या ‘मंडे स्पेशल’ लढतीत (३ जानेवारी) गुणतालिकेत तळाला असलेल्या ओदिशा एफसीसमोर ‘टॉप’ मुंबई सिटी एफसीचे आव्हान आहे.
टिळक मैदान स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघांनी विजयी ट्रॅकवर परतण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ओदिशाला मागील चार सामन्यांत तीन पराभव पाहावे लागले आहेत. शेवटच्या लढतीत त्यांना हैदराबाद एफसीकडून १-६ असा मोठा पराभव पाहावा लागला आहे. ८ सामन्यांत १० गुण मिळवलेल्या ओदिशाचा बचाव दुबळा ठरला आहे. आठव्या हंगामात त्यांनी १४ गोल चढवलेत तर २० खाल्लेत. या हंगामात सर्वाधिक गोल खाण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे. त्यातच एका सामन्याची बंदी असल्याने ओदिशा संघ सोमवारी प्रशिक्षक किको रॅमिरेझ यांच्या विना खेळेल.
यंदाच्या स्पर्धेत आमच्या अनेक वैयक्तिक चुका झाल्यात. त्या महागात पडल्या. मात्र, अमुक एका खेळाडूला दोष देण्यात अर्थ नाही. पराभवासाठी आधी कोचिंग स्टाफ आणि त्यानंतर खेळाडू जबाबदार आहेत, असे मी मानतो. मात्र, वैयक्तिक आणि सांघिक चुका सुधारण्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत. त्यामुळे पराभवाची मालिका खंडित होईल, असा मला विश्वास वाटतो. सोमवारच्या लढतीतील प्रतिस्पर्धी मुंबई सिटी एफसीने पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी केली आहे. तो एक कडवा प्रतिस्पर्धी आहे. मात्र, मागील दोन सामन्यांत त्यांनाही लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही. त्यांचा आम्ही चांगला अभ्यास केला आहे. त्यामुळे मुंबई सिटीशी दोन हात करण्यास आम्ही उत्सुक आहोत, असे सह-प्रशिक्षक किनो गॅर्सिया यांनी म्हटले आहे.
पहिला टप्पा गतविजेता मुंबई सिटी एफसीच्या नावे राहिला. ८ सामन्यांत ५ विजयांसह १६ गुणांनिशी ते गुणतालिकेत अव्वल आहेत. सर्वाधिक गुणांसह सर्वाधिक विजयही त्यांच्या नावावर आहेत. गोलफरकातही (२०-१३) मुंबईने आघाडी राखली आहे. मात्र, डेस बकिंगहॅम यांच्या प्रशिक्षकपदाखालील क्लबचा मागील दोन सामन्यांत कस लागला. आठव्या लढतीत नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीकडून ३-३ अशा बरोबरीत समाधान मानावे लागले. त्यापूर्वी, केरळा ब्लास्टर्स एफसीकडून ०-३ असा मोठा पराभव झाला.
मागील दोन सामन्यांतील खराब खेळातून बोध घेत विजयीपथावर परतण्याचे आमचे लक्ष्य आहे. शेवटची लढत आणि ईयर एन्डिंग ब्रेकदरम्यान आम्ही त्यावर सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न केला. आमचा यापुढेही आक्रमक खेळावर भर राहील. मात्र, बचाव अधिक मजबू करावा लागेल, असे बकिंगहॅम यांनी ओदिशाविरुद्धच्या लढतीपूर्वी सांगितले.
मुंबई सिटीच्या सांघिक कामगिरीत बिपीन सिंगचे मोठे योगदान राहिले आहे. त्याने तीन गोल मारताना दोन गोल करण्यात वाटा उचलला आहे. भारताकडून लिस्टन कोलॅकोनंतर (५+१) बिपीनला सर्वोत्तम कामगिरी करता आली आहे. सर्वात जास्त गोल करण्यासह असिस्ट करण्यात इगोर अँग्युलो (५+२)आघाडीवर आहे. मुंबई सिटी एफसी आणि ओदिशा एफसी आजवर चार सामने एकत्रित खेळलेत. त्यात प्रत्येकाच्या वाट्याला प्रत्येकी दोन विजय आलेत.