गोवा दिनांक (९ जानेवारी) – मुंबई सिटी एफसीनं इंडियन सुपर लीगच्या ( आयएसएल) गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले असले तरी मागील चार सामन्यांत त्यांना एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे सोमवारी बंगलोर एफसीविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून अव्वल स्थानावरील पकड मजबूत करण्याचा मुंबईचा निर्धार आहे. मागील सामन्यात मुंबई सिटी एफसीला एससी ईस्ट बंगालनं गोलशून्य बरोबरीत रोखले. त्यांना चार सामन्यांत विजय मिळवता आलेला नाही. डेस बकिंग्हॅम यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या मुंबई संघाची निराशाजनक कामगिरी ही हैदराबाद एफसी, जमशेदपूर आणि एटीके मोहन बागान यांना अव्वल स्थानाच्या आणखी नजीक पोहोचवत आहे.
पहिल्या सहा सामन्यांत मुंबई सिटीनं १७ गोल्स केले आणि तेच मागील चार लढतीत त्यांना पाच गोल करता आले. पहिल्या सहा सामन्यांत त्यांनी प्रत्येकी किमान एक गोल तरी केला होता, परंतु आता चार सामन्यांत त्यांना दोन लढतीत गोल करता आलेला नाही. मध्यरक्षक अहमद जाहौह याच्यावर झालेली निलंबनाची कारवाई आणि रोवलिन बोर्गेस याची दुखापतीमुळे माघार ही संघाला महागात पडत आहे. विनित रायच्या रुपानं संघानं नवा खेळाडू करारबद्ध केलाय आणि तो अपुईयासोबत मध्यरक्षकाची जबाबदारी पार पाडतोय. पण, जाहौहचे नसणे संघाला महागात पडतेय.
मोरोक्कोच्या मध्यरक्षकानं आयएसएल २१-२२ मध्ये सर्वाधिक ६ वेळा गोल करण्यास सहाय्य केले आहे. त्यानं तयार केलेल्या सेट पीसमुळे मुंबईनं या पर्वात १० सेट पीस गोल केले. बंगलोर व जमशेदपूर एफसीनंही १० गोल सेट पीसनं केले आहेत. ”आता कामगिरी उंचवायला हवी आणि आगामी सामन्यात एकही गोल न खाता विजय मिळवायला हवेत. आम्हाला बचावफळीत चांगली कामगिरी करण्याची गरज आहे,”असे प्रशिक्षक बकिंग्हॅम यांनी सांगितले.
दुसरीकडे बंगलोरचा संघ गुणतालिकेत ९व्या क्रमांकावर आहे. पण, हळुहळू का होईना त्यांच्या कामगिरीत सुधारणा पाहायला मिळत आहे. पर्वाच्या पहिल्या टप्प्यात बंगलोरला फक्त दोन विजयांवर समाधान मानावे लागले होते. मागील सामन्यात एससी ईस्ट बंगालनं त्यांना १-१ असे बरोबरीत रोखले होते. मार्को पेझाईयूलीनं प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर बंगलोरनं मागील चार सामन्यांत एकही पराभव पत्करलेला नाही, परंतु संघाच्या कामगिरीत सुधारणा होणे अपेक्षित आहे. बंगलोरला ओपन प्लेमध्ये गोल करता आले पाहिजेत, मागील १० पैकी १ गोलच त्यांनी ओपन प्लेमध्ये केला.
”मुंबई हा अव्वल संघ आहे, परंतु या लीगमध्ये यंदा अजूनही अनेक अव्वल संघ आहेत. त्यांच्याविरुद्ध पहिला सामना आम्ही ३-१ असा गमावला, परंतु त्या सामन्यात सर्वाधिक काळ चेंडूवर आमचा ताबा होता. आम्हाला बचावफळीत सुधारणा करण्याची गरज आहे आणि त्याचवेळी आक्रमणही करत रहावे लागणार आहे,”असे पेझाईयूलींनी सांगितले.