हैदराबाद। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) हैदराबाद एफसीने शनिवारी केरला ब्लास्टर्स एफसीला हरवून मोसमातील पहिला विजय नोंदविला. पूर्वार्धातील गोलच्या पिछाडीनंतर हैदराबादतर्फे ऑस्ट्रीयाचा मार्को स्टॅन्कोविच आणि ब्राझीलचा मार्सेलिनीयो यांनी दुसऱ्या सत्रात पारडे फिरविले. मार्कोने पेनल्टी सत्कारणी लावत बरोबरी साधली होती.
जी. एम. सी. बालयोगी ऍथलेटीक स्टेडियमवरील लढतीत हैदराबादने घरच्या मैदानावर यशस्वी प्रारंभ केला. आधीचे दोन सामने त्यांना गमवावे लागले होते. त्यात त्यांच्याविरुद्ध आठ गोल झाले होते. त्यातही सलामीला एटीकेविरुद्ध पाच गोल पत्करावे लागले होते. घरच्या मैदानावर फॉर्म गवसण्याची प्रशिक्षक फिल ब्राऊन यांची आशा सार्थ ठरली. दुसरीकडे ब्लास्टर्सला बार्थोलोम्यू ओगबेचे या हुकमी स्ट्रायकरच्या काही प्रयत्न हुकण्याचा फटका बसला.
हैदराबादने तीन गुणांसह तळातून दोन क्रमांक प्रगती करताना आठवे स्थान गाठले. ब्लास्टर्सला तीन सामन्यांत दुसरा पराभव पत्करावा लागला. तीन गुणांसह त्यांचे सातवे स्थान कायम राहिले. एटीके आणि जमशेदपूर एफसी यांचे प्रत्येकी सर्वाधिक सहा गुण आहेत.
खाते उघडण्याची शर्यत ब्लास्टर्सने जिंकली. साहल अब्दुल समदने पेनल्टी क्षेत्रात मारलेला चेंडू हेरत राहुलने चपळाई दाखविली. त्याने अचूक किक मारत हैदराबादचा गोलरक्षक कमलजीत सिंगला चकविले.
हैदराबादने दुसऱ्या सत्रात बरोबरी साधली. 53व्या मिनिटास हैदराबादचा बचावपटू महंमद यासीर याने आगेकूच केली असता ब्लास्टर्सच्या मोहमदौ गिनींगने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मोहमदौने पाय बाजूला घेण्याचा प्रयत्न केला, पण तोच यासीरला त्याचा धक्का लागला. यासीर मैदानावर पडताच पंच आर. वेंकटेश यांनी पेनल्टीचा इशारा केला. मार्कोने या सुवर्णसंधीचे गोलमध्ये रुपांतर केले.
निर्धारीत वेळ संपण्यास नऊ मिनिटे बाकी असताना मार्सेलिनीयोने फ्री किकवर अफलातून फटका मारला. हा चेंडू खेळाडूंच्या भिंतीवरून नेटच्या डाव्या कोपऱ्यात गेला. त्यावेळी ब्लास्टर्सचा गोलरक्षक टी. पी. रेहेनेश चकला.
ब्लास्टर्सने सुरवात भक्कम केली. समदने ड्रिबलिंग करीत पेनल्टी क्षेत्रात मुसंडी मारत डावीकडील बार्थोलोम्यू ओगबेचेला पास दिला. त्यावर ओगबेचे मात्र नियंत्रण मिळू शकला नाही. अखेरीस चेंडू बाहेर गेला. नंतर गोल कीकही व्यर्थ ठरली. यासीरने 12व्या मिनिटाला बॉक्सबाहेरून प्रयत्न केला, पण कमलजीतने चेंडू आरामात अडविला.
तीन मिनिटांनी मोहमदौने उजवीकडून राहुलला पास दिला, पण या चालीचे फिनीशींग झाले नाही. राहुलने मारलेला चेंडू बारवरून बाहेर गेला.
हैदराबादचा पहिला उल्लेखनीय प्रयत्न 17व्या मिनिटाला झाला. मार्सेलिनीयोने डावीकडून मुसंडी मारली, पण ब्लास्टर्सचा बचावपटू महंमद रकीपने त्याला रोखले. राहुलने 22व्या मिनिटाला 20 यार्डावरून मारलेला चेंडू स्वैर होता, पण हा प्रयत्न चांगला होता.
ब्लास्टर्सला गोलरक्षरक टी. पी. रेहेनेश याची ढिलाई 34व्या मिनिटाला भोवली असती. त्यावेळी हैदराबादचा स्ट्रायकर अभिषेक हलदरने प्रयत्न केला, पण त्याला लागलेला चेंडू नेटबाहेरून गेला.
निकाल:
हैदराबाद एफसी: 2 (मार्को स्टॅन्कोविच 54-पेनल्टी, मार्सेलिनीयो 81) विजयी विरुद्ध केरला ब्लास्टर्स एफसी: 1 (के. पी. राहुल 34)