कोलकता। दोन वेळच्या माजी विजेत्या एटीकेने हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) सहाव्या मोसमात महत्त्वपूर्ण विजय नोंदवित आघाडीही घेतली. शनिवारी येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर झालेल्या लढतीत एटीकेने जमशेदपूर एफसीला 3-1 असे हरविले. भारतीय खेळाडू रॉय कृष्णाने दोन पेनल्टी सत्कारणी लावल्या, तर बदली खेळाडू एदू गार्सियाने एका गोलचा वाटा उचलला. सामन्यातील चारही गोल दुसऱ्या सत्रात झाले, ज्यात पेनल्टीवरील तीन गोलांचा समावेश होता.
अँटोनिओ हबास यांच्या मार्गदर्शनाखाली एटीकेने अथक चाली रचल्या. त्यामुळे जमशेदपूरचा अनुभवी गोलरक्षक सु्ब्रत पॉल याच्यासह बचाव फळीवर दडपण आले. त्यातच धसमुसळ्या खेळाचा फटका जमशेदपूरला बसला. एटीकेने सलामीला झालेल्या पराभवानंतर सलग तिसऱ्या विजयासह हॅट्रीक नोंदविली.
एटीकेचा हा 4 सामन्यांतील तिसरा विजय असून त्यांचा एक पराभव झाला आहे. त्यांनी 9 गुणंसह आघाडी घेताना एफसी गोवा, नॉर्थईस्ट युनायटेड एफसी (प्रत्येकी 8) आणि जमशेदपूरला मागे टाकले. जमशेदपूरला 4 सामन्यांत पहिलाच पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांची अपराजित मालिका संपुष्टात आली. 2 विजय व एका बरोबरीसह त्यांचे 7 गुण कायम राहिले. त्यांची एक क्रमांक घसरण झाली. एटीकेने चार वरून पहिला क्रमांक गाठला.
दुसऱ्या सत्रात दहा मिनिटांच्या खेळानंतर एटीकेच्या रॉय कृष्णाला मध्य क्षेत्रात चेंडू मिळाला. त्याने नेटच्या दिशेने आगेकूच सुरु केली. तो पेनल्टी क्षेत्रात जाताच जमशेदपूरच्या टिरीने मैदानावर घसरत त्याला पाडले. त्यामुळे पंच राहुलकुमार गुप्ता यांनी पेनल्टीचा इशारा केला. कृष्णानेच ही पेनल्टी घेतली आणि शांतचित्ताने नेटच्या उजव्या कोपऱ्यात चेंडू मारला. त्यावेळी जमशेदपूरचा गोलरक्षक सुब्रत पॉल याचा अंदाज चुकला आणि तो विरुद्ध बाजूला झेपावला.
त्यानंतर कृष्णाला आधी टिरीने रोखण्याचा प्रयत्न केला, तरिही त्याची घोडदौड चालू राहिल्याने मेमो मौराने दांडगाई केली. त्यामुळे एटीकेला दुसरी पेनल्टी बहाल करण्यात आली. आधी जमशेदपूरच्या खेळाडूंनी आधीच धाव घेतल्यामुळे पंचांनी कृष्णाला पुन्हा पेनल्टी घेण्यास सांगितले. कृष्णाने एकाग्रता कायम राखत यावेळी नेटच्या डावीकडे चेंडू मारत लक्ष्य साधले.
पाच मिनिटे बाकी असताना एटीकेच्या डेव्हिड विल्यम्सने अकारण न्यो अॅकोस्टाला पाडले. त्यामुळे जमशेदपूरला पेनल्टी मिळाली, जी सर्जिओ कॅस्टेलने सत्कारणी लावली. एटीकेने भरपाई वेळेत आणखी एक गोल करीत विजयावर धडाक्यात शिक्कामोर्तब केले. बदली खेळाडू एदू गार्सिया याने हा गोल केला.
तिसऱ्याच मिनिटाला एटीकेचा बचावपटू प्रबीर दासला अवैधपणे रोखल्यामुळे जमशेदपूरचा बचावपटू किगन परेराला यलो कार्डला सामोरे जावे लागले.
सहाव्या मिनिटाला जमशेदपूरचा गोलरक्षक सुब्रत पॉल बॅकपास घेताना चकला. त्यावेळी एटीकेचा फॉरवर्ड डेव्हीड विल्यम्सने फायदा घेण्याचा प्रयत्न केला. पॉलने तरिही धुर्तपणा दाखविला, पण चेंडू गोलकीकसाठी बाहेर गेला.
आठव्या मिनिटाला जमशेदपूरने प्रयत्न केला. त्यांचा मध्यरक्षक पिटीला डावीकडे चेंडू मिळाला. त्याने बाजू बदलत आगेकूच केली आणि मध्य भागी छान चेंडू मारला. त्यावेळी फारुख चौधरीने उडी मारत नेटच्या दिशेने हेडिंग केले, पण चेंडू क्रॉसबारला लागला. पुढे पडलेला चेंडू एटीकेच्या खेळाडूने ताब्यात मिळविला.
एटीकेला 19व्या मिनिटाला चांगली संधी मिळाली होती. प्रबीरने उजवीकडे चेंडू मिळविला. त्याच्या सुंदर क्रॉस पासवर विल्यम्सने पुढे झेपावत हेडिंग केले, पण ते स्वैर होते.
तीन मिनिटांनी एटीकेने आणखी एक छान चाल रचली. डावीकडून मध्यरक्षक जेव्हियर हर्नांडेझ आणि फॉरवर्ड मायकेल सुसैराज यांनी आगेकूच केली. जेव्हियरला पास देत मायकेल पुढे धावला, पण क्रॉस पास त्याला मिळण्यापूर्वीच सुब्रतने चेंडूवर ताबा घेतला.
दरम्यान, पावसाच्या सरी पडू लागल्या. त्यातही खेळ सुरु होता. मायकेल आणि विल्यम्स यांनी प्रयत्न केला, पण मायकेल तोल जाऊन पेनल्टी क्षेत्रात घसरला. त्यामुळे त्याला चेंडूवरील ताबा गमवावा लागला.
मध्यंतरास चार मिनिटे बाकी जमशेदपूरचा मध्यरक्षक अरीतोर मॉनरॉयने अप्रतिम बचाव केला. मग ओल्या मैदानामुळे चेंडू किती पुढे जाईल याचा अंदाज सुब्रतला घेता आला नाही. त्याचा कमकुवत फटका पाहून विल्यम्स पुढे सरसावला. त्याने चेंडू ताब्यातही घेतला आणि रॉय कृष्णाला पास दिला. यातून जेव्हियरला पास मिळाला, पण तोपर्यंत मॉनरॉय मागे धावत गेला आणि त्याने धोका वाढण्यापूर्वीच जेव्हियरला रोखत चेंडूवर ताबा मिळविला.
दुसऱ्या सत्राला एटीकेने सकारात्मक सुरवात केली. 47व्या मिनिटाला मायकेलने जेव्हियर हर्नांडेझला पेनल्टी क्षेत्रात डावीकडे पास दिला. जेव्हीयरने धुर्तपणे बॅकपास देताच मायकेलने नेटच्या दिशेने फटका मारला, पण तो स्वैर होता.