बेंगळुरू। हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) सहाव्या मोसमात गतविजेत्या बेंगळुरू एफसीची निर्णायक विजयाची प्रतिक्षा अखेर चौथ्या सामन्यात संपुष्टात आली. माजी विजेत्या चेन्नईयीन एफसीवर असा विजय मिळवित बेंगळुरूने घरच्या मैदानावर पहिलावहिला विजय संपादन केला.
श्री कांतीरवा स्टेडियमवर एरीक पार्टालू, कर्णधार सुनील छेत्री यांनी पूर्वार्धात, तर बदली खेळाडू सेम्बोई हाओकीप याने उत्तरार्धात गोल केला. दुसरीकडे चेन्नईयीनची निर्णायक विजयाचीच नव्हे तर गोलची प्रतिक्षाही कायम राहिली. गोल न करू शकलेला हा यंदा आतापर्यंत एकमेव संघ आहे.
स्पेनच्या कार्लेस कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या बेंगळुरूने 4 सामन्यांत एक विजय आणि तीन बरोबरी अशा कामगिरीसह सहा गुण मिळवून पाचवे स्थान गाठले. तीन क्रमांक प्रगती करताना बेंगळुरूने ओडिशा एफसी, केरला ब्लास्टर्स एफसी आणि मुंबई सिटी एफसी (तिन्ही संघांचे 4 सामन्यांतून 4 गुण) मागे टाकले. एटीके 4 सामन्यांतून सर्वाधिक 9 गुणांसह आघाडीवर आहे. चेन्नईयीनला 4 सामन्यांत तिसरा पराभव पत्करावा लागला. एकमेव बरोबरीसह एक गुण मिळवून हा संघ तळात दहाव्या स्थानावर आहे.
13 दिवसांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय ब्रेकपूर्वीची ही अखेरची लढत होती. दोन्ही संघांना निर्णायक विजयाची प्रतिक्षा होती. बेंगळुरूच्या तिन्ही लढती बरोबरीत सुटल्या होत्या, तर चेन्नईयीनला तीन लढतींत एकमेव बरोबरी आणि दोन पराभव पत्करावे लागले होते.
बेंगळुरूने खाते उघडण्याची शर्यत जिंकली. 14व्या मिनिटास त्यांना कॉर्नर मिळाला. डिमास डेल्गाडोने त्यावर परिपूर्ण फटका मारला आणि पार्टालू याने हेडींगही तसेच अफलातून केले.
खाते उघडल्यानंतर बेंगळुरूचे मनोधैर्य उंचावले. त्यांचा दुसरा गोल प्रतिआक्रमणावर झाला. रॅफेल आगुस्टोने दिर्घ आणि अचूक पास दिला. त्यावर कर्णधार छेत्रीने पहिल्या प्रयत्नात चेंडूवर ताबा मिळवित लक्ष्य साधले. त्याचा फटका इतका अप्रतिम होता की चेन्नईयीनचा गोलरक्षक विशाल कैथला जवळच्या पोस्टपाशी चेंडू येऊनही रोखण्याची संधी मिळाली नाही.
सहा मिनिटे बाकी असताना चेन्नईयीनचा बचावपटू एली साबिया याच्या ढिलाईचा फायदा उठवित सेम्बोईने गोल केला. दुसऱ्या सत्रात छेत्रीचा एक प्रयत्न थोडक्यात हुकला.
बेंगळुरूने आक्रमक सुरवात केली होती, पण कैथच्या चपळाईने त्यांना सुरवातीला निरुत्तर केले होते. चौथ्याच मिनिटाला उजीकडून राहुल भेकेच्या थ्रो-इनवर पार्टालूने उडी घेत केलेले हेडिंग कैथने रोखले. पुढच्याच मिनिटाला याच बाजूला भेकेने थोडा लांबून थ्रो-इन केला. आगुस्टोने तो छातीने नियंत्रीत करीत जुआननकडे चेंडू सोपविला, पण कैथने ही चालही फोल ठरविली. त्याने डाव्या पायाने चेंडू अडविला.
चेन्नईयीनचा पहिला उल्लेखनीय प्रयत्न 43व्या मिनिटाला झाला. एडवीन वॅन्सपॉलने उजवीकडून दिलेल्या क्रॉस पासनंतर आंद्रे शेम्ब्रीने उडी घेत हेडिंग केले, पण ते स्वैर होते. त्यामुळे बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीत सिंगला काही करावे लागले नाही. चेन्नईयीनची अशी निराशा कायम राहिली.