चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. वयाच्या ४०व्या वर्षातही तो जुन्या रंगात फलंदाजी करताना दिसतो आहे. आयपीएल २०२२च्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने शानदार अर्धशतक केले होते. त्यानंतर शुक्रवारी (३१ मार्च) लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियम झालेल्या सामन्यातही धोनीने छोटेखानी पण झुंजार खेळी केली. यादरम्यान त्याने विक्रमही केला आहे.
एमएस धोनीचा विश्वविक्रम
लखनऊविरुद्ध (CSK vs LSG) धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. यावेळी चेन्नईचा संघ ५ विकेट्स १८९ धावा अशा स्थितीत होता. अशात संघाला भक्कम स्थितीत नेण्याची जबाबदारी धोनीवर (MS Dhoni) होती. धोनी फलंदाजीला आला तेव्हा लखनऊकडून आवेश खान गोलंदाजी करत होता. आवेशने धोनीला आऊट साइड ऑफला शॉर्ट चेंडू फेकला. धोनीने या चेंडूवर सपाट बॅटने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फटका मारला आणि चेंडू थेट षटकारासाठी (Six On First Ball Of IPL Inning) गेला.
ही धोनीच्या कारकिर्दीतील पहिलीच वेळ होती, जेव्हा त्याने फलंदाजीला आल्यानंतर आपल्या खेळीतील पहिल्याच चेंडूवर षटकार मारला आहे. यापूर्वी आयपीएल कारकिर्दीत त्याने असा पराक्रम केला नव्हता. असे असले तरीही, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटदरम्यान २ वेळा हा पराक्रम केला आहे. त्याने इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध २०१७ साली आपल्या खेळीतील पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता.
धोनीने अजून एक विक्रम केला नावे
याखेरीज लखनऊविरुद्धच्या सामन्यादरम्यान धोनीने अजून एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने लखनऊविरुद्ध ६ चेंडूंमध्ये १ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने नाबाद १६ धावा केल्या. या छोटेखानी खेळीसह त्याने ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमधील आपल्या ७००० धावा पूर्ण केल्या आहेत. यासह तो ७००० धावा पूर्ण करणारा सहावा भारतीय खेळाडू ठरला आहे. धोनीपूर्वी विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना, शिखर धवन आणि रॉबिन उथप्पा यांनी ही कमाल केली होती.
मात्र चेन्नईला लखनऊविरुद्धचा हा सामना ६ विकेट्स राखून गमावला आहे. हा त्यांचा आयपीएल २०२२मधील सलग दुसरा पराभव आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘मुंबईत नायगरा वॉटरफॉलप्रमाणे दव पडतंय’, सलग दुसऱ्या पराभवानंतर सीएसकेच्या प्रशिक्षकांचे मोठे भाष्य
‘मला हे बिलकुल आवडलेलं नाही’, हातातला सामना गमावल्यानंतर ‘जडेजाने’ टोचले धोनीचे कान
RCB मॅनेजमेंटला १०० तोफांची सलामी! नवविवाहित मॅक्सवेलसाठी सजवली खास ‘हनीमुन रुम’, Video तुफान चर्चेत