वर्षाची शेवटची ग्रँडस्लॅम असललेल्या यूएस ओपनमध्ये इटलीच्या जॅनिक सिनरनं इतिहास रचला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला सिनर यूएस ओपन जिंकणारा पहिला इटालियन पुरुष टेनिसपटू ठरला आहे. अंतिम सामन्यात त्यानं अमेरिकेच्या 26 वर्षीय टेलर फ्रिट्झचा 6-3, 6-4, 7-5 असा पराभव केला. दोघांमधील हा सामना 2 तास 16 मिनिटे चालला.
23 वर्षीय सिनर यूएस ओपन जिंकणारा केवळ दुसरा इटालियन टेनिसपटू ठरला आहे. यापूर्वी फ्लेव्हिया पेनेट्टा या महिला खेळाडूनं ही कामगिरी केली होती. तिनं 2015 मध्ये यूएस ओपनच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत रॉबर्टा विंचीचा पराभव केला होता.
या पराभवामुळे जागतिक क्रमवारीत 12व्या स्थानी असलेल्या टेलर फ्रिट्झचं पहिल्या विजेतेपदाचं स्वप्न भंगलं. 2016 पासून ग्रँडस्लॅम खेळत असलेला टेलर प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला आहे. जर त्यानं फायनल सामना जिंकला असता, तर तो 2003 नंतर यूएस ओपन जिंकणारा पहिलाच अमेरिकन पुरुष टेनिस स्टार बनला असता.
इटलीच्या जॅनिक सिनरचं हे दुसरं ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. त्यानं या वर्षातील पहिलं ग्रँडस्लॅम म्हणजे ऑस्ट्रेलियन ओपन जिंकलं होतं. त्या ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत सिनरनं रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा 3-6, 3-6, 6-4, 6-4, 6-3 असा पराभव केला होता.
यूएस ओपनच्या अंतिम सामन्यात सिनरनं सुरुवातीपासूनच वर्चस्व राखलं. त्याने पहिला सेट 6-3 अशा फरकानं सहज जिंकला. यानंतर टेलरनं दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला. सिनरनं दुसरा सेट 6-4 असा जिंकला. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये अमेरिकन टेनिसस्टार आव्हान देईल, अशी अपेक्षा होती, पण इथेही चाहत्यांची निराशा झाली. पहिल्या दोन सेटप्रमाणेच सिनरनं दमदार खेळ दाखवत तिसरा सेटही 7-5 असा जिंकून विजेतेपद पटकावलं.
हेही वाचा –
IND vs BAN: पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये स्थान गमावलेले 3 दुर्दैवी खेळाडू
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियासोबत दिसणार जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज, गंभीरशी खास नातं
IND VS BAN; श्रेयस अय्यरची सुट्टी; पंत-कोहलीचे पुनरागमन, पाहा संघाबाबत मोठे वैशिष्ट्ये