पुणे। आयटीएफ महिला टेनिस स्पर्धा सध्या पुण्यातील डेक्कन जिमखान्याच्या टेनिस कोर्टवर सुरु आहे. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनने आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये भारताच्या ऋतुजा भोसले, वैदेही चौधरी आणि झील देसाई यांचे महिला एकेरी गटातील आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले आहे.
मात्र, असे असले तरी दुहेरी गटात भारताच्या रिया भाटिया आणि रोमानियाच्या मिरीयम बियांका बुलगारु व ऋतुजा भोसले आणि इमिली वेबली स्मिथ या जोड्यांनी अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे.
ऋतुजा भोसलेचा पराभव
या स्पर्धेत संभाव्य विजेती म्हणून पाहिले जात असलेल्या ऋतुजा भोसलेला पराभवाचा धक्का बसला आहे. चौथ्या मानांकित ऋतुजाला पाचव्या मानांकित २४ वर्षीय मारियाना झकार्ल्यूकने पराभूत केले. युक्रेनच्या मारियानाने १ तास ४२ मिनिटे चाललेल्या उपांत्यपूर्व सामन्यात ऋतुजाचा ७-५, ६-२ अशा फरकाने पराभव केला.
ऋतुजाने पहिल्या सेटमध्ये कडवी लढत दिली होती. मात्र मारियानाने पहिला सेट जिंकला आणि आत्मविश्वासाने दुसरा सेट खेळताना सामन्यात पूर्णपणे नियंत्रण मिळवले. त्याचबरोबर दुसरा सेट तिने सहज जिंकला आणि सामनाही जिंकला.
सामन्यानंतर मारियाना म्हणाली, हा तिचा भारतात खेळण्याचा पहिलाच अनुभव आहे. याआधी ती कधीही ऋतुजाविरुद्ध खेळली नव्हती. त्यामुळे सामन्याआधी ती थोडी नर्व्हस होती. मात्र, सामना सुरु झाल्यानंतर तिने सामन्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवले.
त्याचबरोबर भारतात येणे सोपे नव्हते असेही तिने सांगितले. भारतात येण्यासाठी तिला थोडा संघर्ष करावा लागला. तसेच क्वारंटाईनचा कालावधीही पूर्ण करावा लागला. एवढेच नाही तर भारतातील उष्ण वातावरणाशी जुळवून घ्यावे लागले, याबद्दलही तिने भाष्य केले.
वैदेही, झील यांचे आव्हान संपुष्टात
सातव्या मानांकित झीलचा एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात तिसऱ्या मानांकित ब्राझीलच्या लौरा पिगोस्सीने ६-४, ६-३ असा सहज पराभव केला. तसेच वैदेहीने मात्र उपांत्यपूर्व सामन्यात ग्रेट ब्रिटनच्या सहाव्या मानांकित इमेली वेबली-स्मिथविरुद्ध कडवी लढत दिली. मात्र, वैदेहीचे प्रयत्न तोकडे पडले. २ तास ३२ मिनिटे चाललेल्या या सामन्यात वैदेहीला २-६, ६-४, ६-३ असा पराभव स्विकारावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या –
युवा उद्योजक पुनीत बालन यांनी टेनिस प्रिमियर लीगमध्ये खरेदी केली ‘पुणे जग्वार्स’ टीम
सुमित नागलने नोंदवला कारकिर्दीतील सर्वोत्तम विजय, अर्जेंटीना ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक
जोकोविचच ‘अव्वल’! ३१० व्या आठड्यात पहिल्या क्रमांकावर कायम राहात फेडररच्या विश्वविक्रमाशी बरोबरी