इंग्लंडच्या भारत दौऱ्याला शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) चेन्नई येथील कसोटीने सुरुवात होईल. भारतीय संघाने आजपासून (१ फेब्रुवारी) सरावाला सुरुवात केली आहे तर, इंग्लंड संघ उद्यापासून सरावासाठी मैदानात उतरेल. तत्पूर्वी, इंग्लंड संघाचा फिरकीपटू जॅक लीचने मालिकेआधी रणशिंग फुंकले आहे. आम्हाला भारतीय संघाची कमजोरी माहित आहे, असे त्याने म्हटले.
“पानेसर आणि स्वानपासून खूप काही शिकलो”
सध्या इंग्लंडचा अव्वल कसोटी फिरकी गोलंदाज असलेला लीच आगामी मालिकेसाठी कमालीचा उत्सुक आहे. लीचने मालिकेविषयी बोलताना म्हटले, “मी माझ्या बलस्थानांवर गोलंदाजी करेल. मॉन्टी पानेसर व ग्रॅहम स्वान यांची गोलंदाजी पाहणे मला आवडते. मी त्यांच्यापासून बरेच काही शिकण्याचा प्रयत्न करतो. मॉन्टीने २०१२ च्या भारत दौऱ्यावर काहीशी वेगाने गोलंदाजी करत यश मिळवले होते. मी कदाचित त्या वेगाने गोलंदाजी करणार नाही. वेगात विविधता राखण्यात यशस्वी झालेले अनेक गोलंदाज मी पाहिले आहेत. आम्ही भारतीय संघाच्या कमजोरीचा अभ्यास केला आहे.”
“भारतात आव्हानात्मक परिस्थिती असेल”
प्रथमच भारत दौऱ्यावर येत असलेल्या या २९ वर्षीय गोलंदाजाने म्हटले, “भारतात येणाऱ्या इतर देशातील फिरकीपटूंना आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जावे लागते. मात्र, मी यासाठी तयार आहे. भारतासारख्या दर्जेदार संघाविरुद्ध खेळून स्वतःची चाचणी करून घेण्याची चांगली संधी असते. हा एक चांगला अनुभव असेल आणि आणि मला त्याचा आनंद घ्यायचा आहे.”
श्रीलंका दौऱ्यावर चमकदार कामगिरी केली लीचने
जॅक लीचने नुकत्याच संपलेल्या श्रीलंका दौऱ्यावर चमकदार कामगिरी केली होती. लीचने या दौऱ्यावरील दोन कसोटी सामन्यात १० बळी मिळवले होते. भारताविरुद्धच्या आगामी मालिकेत लीचसोबत युवा डॉम बेस फिरकीची बाजू सांभाळेल. अनुभव अष्टपैलू मोईन अली त्यांना साथ देईल.
महत्वाच्या बातम्या:
आयएसएल २०२०-२१ : ओदीशाला हरवून जमशेदपूरच्या आशा कायम
जस्टिन लँगर अतिशय कठोर प्रशिक्षक, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराचे भाष्य
भारत-इंग्लंड मालिकेचे प्रसारण करण्यासाठी पुढे आला हा समूह