इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यानचा दुसरा कसोटी सामना येथे सोमवारी (१६ ऑगस्ट) संपन्न झाला. पाहुण्या भारतीय संघाने इंग्लंडवर अखेरच्या दिवशी १५१ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० ने आघाडी घेतली. या सामन्यादरम्यान तिसऱ्या दिवशी एक इंग्लिश प्रेक्षक भारतीय संघाची जर्सी घालून मैदानात उतरला होता. त्यामुळे मैदानावर चांगलाच हशा पिकलेला. त्यानंतर आता या प्रेक्षकाने एक नवीन खुलासा केला आहे.
अचानक मैदानात उतरला इंग्लिश प्रेक्षक
लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंड संघ फलंदाजी करत असताना जार्वो नामक एक इंग्लिश प्रेक्षक अचानकपणे मैदानात घुसला. या प्रेक्षकाने भारतीय संघाची कसोटी जर्सी परिधान केली होती. त्या जर्सीवर जार्वो ६९ असे लिहिले होते. ज्यावेळी सुरक्षारक्षकांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याने आपली जर्सी दाखवली व आपण भारतीय संघाचा सदस्य असल्याचे म्हटले. यावर अनेक भारतीय खेळाडू व प्रेक्षक हसताना दिसले होते.
केला हा महत्त्वपूर्ण खुलासा
सामना संपल्यानंतर आता जार्वो याने एक खुलासा केला आहे. तो ज्या वेळी प्रथम मैदानात गेला त्यावेळी भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने प्रथमता त्याला पाहिले. त्यावेळी जडेजाने आपल्याला विचारले की,
“कोणत्या बाजूने तुला गोलंदाजी करायला आवडेल?”
याच प्रकारामुळे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला आपले हसू आवरता आले नव्हते.
जार्वोने केले होते ट्विट
इंग्लंडचा रहिवासी असलेल्या जार्वो सध्या दुबई येथे नोकरी करत आहे. त्याने या घटनेनंतर ट्विट करताना लिहिले होते की, मी भारतासाठी खेळणारा पहिला श्वेतवर्णीय क्रिकेटपटू आहे. जार्वो हा एक प्रॅन्कस्टार म्हणून देखील ओळखला जातो.
भारतीय संघाने लॉर्ड्स कसोटी अखेरच्या दिवशी १५१ धावांनी जिंकत मालिकेत आघाडी घेतली आहे.भारतीय वेगवान गोलंदाजांनी फलंदाजी गोलंदाजी अशा दोन विभागात महत्त्वपूर्ण योगदान देत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. लॉर्ड्स मैदानावर भारताचा हा केवळ तिसरा कसोटी विजय आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
लॉर्ड्सवरील संस्मरणीय विजयानंतर विराटला झाली धोनीची आठवण, म्हणाला…