चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या शतक महोत्सवा निमित्ताने आयोजित चिंतामणी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत जय भारत, अंकुर स्पोर्ट्स, जॉली क्रीडा मंडळ व विजय क्लब या चार संघानी उपांत्य फेरीत धडक मारली.
जय भारत मुंबई शहर विरुद्ध केदारनाथ मुंबई उपनगर यांच्यात झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांत जय भारत संघाने ३५-२० असा सहज विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. जय भारत कडून चढाईत सागर कावीलकर, अभिजित घोडे तर पकडीत बाजीराव होडगे व मधुकर गर्जे यांनी चांगला खेळ केला. केदारनाथ कडून सुशांत कदम, ओंकार कदम बरे खेळले.
अंकुर स्पोर्ट्स क्लब विरुद्ध विजय बजरंग व्यायाम शाळा मंडळ यांच्यात मध्यंतरापर्यत अंत्यत चुरशीची लढत बघायला मिळाली. विजय बजरंग मंडळाने पहिला लोन टाकत सामन्यांत आघाडी मिळवली होती. मात्र मध्यंतरापर्यत अंकुर ने विजय बजरंगवर लोन टाकत १४-१२ अशी आघाडी मिळवली. सुशांत साहिल व किसन बोटे यांनी नंतर चांगला खेळ करत आघाडी वाढवली. २८-१८ असा विजय मिळवत अंकुर स्पोर्ट्स संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
जॉली क्रीडा मंडळ उपनगर विरुद्ध बंड्या मारुती उपनगर यांच्यात झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांत जॉली क्रीडा मंडळाने ३४-१७ असा सहज विजय मिळवत उपांत्यफेरीत धडक मारली. नामदेव इस्वालकर, अभिषेक नर, विशाल राऊळ यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर जॉली संघाने विजय मिळवला. तर विजय क्लब विरुद्ध गोल्फादेवी यांच्यात झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांत ५४-१४ असा एकतर्फी विजय मिळवत विजय क्लब संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
त्याआधी झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांत बंड्या मारुती संघाने ४०-१९ असा स्वस्तिक संघा विरुद्ध विजय मिळवला. तर विजय कलुबने ३५-२५ श्री नूतन सोनारसिद्ध धाटाव, गोल्फादेवीने ४१-३० असा आई अष्टभुजा पालघर, जॉली संघाने ३६-२९ असा शिवशक्ती संघावर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.
उपांत्य फेरीचे सामने:-
१) जय भारत मुंबई शहर विरुद्ध विजय क्लब मुंबई शहर
२) अंकुर स्पोर्ट्स मुंबई शहर विरुद्ध जॉली क्रीडा मुंबई उपनगर