मुंबई: तब्बल दोन हजार कबड्डीप्रेमींची गर्दी, कबड्डी संघांचा सळसळता उत्साह आणि आयोजकांच्या नीटनेटक्या आयोजनात सुरू झालेल्या वरळी स्पोर्टस् क्लबच्या द्वितीय श्रेणी कबड्डी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी जय ब्राह्मणदेवने ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्टचा 33-27 असा पराभव केला आणि दमदार विजयी सलामी दिली. तसेच पंचगंगा, अमर सुभाष आणि साई के दिवाने या संघांनीही दणदणीत विजयाची नोंद केली.
Read: मी अंबाती रायडूऐवजी रहाणेला वनडे संघात घेतल असतं- सौरव गांगुली
क्रिकेटचे माहेरघर असलेल्या वरळी स्पोर्टस् क्लबच्या मैदानात पुन्हा एकदा कबड्डी कबड्डीचा दम घुमला. माजी राज्यमंत्री आणि स्थानिक आमदार सचिन अहिर,क्लबचे सरचिटणीस अभय हडप, कोषाध्यक्ष मिलिंद ब्रह्मे, चंद्रकांत आचरेकर, प्रसिद्ध क्रीडा संघटक राणाप्रताप तिवारी, राजेंद्र अधटराव आणि स्पर्धा प्रमुख राजेश सॅमसन यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला.
त्यानंतर ओम श्री साईनाथ आणि जय ब्राह्मणदेव यांच्यात झालेल्या सलामीच्या सामन्यात कबड्डीप्रेमींना जोरदार खेळ पाहायला मिळाला.
विशेष म्हणजे वर्षभरात प्रथमच होत असलेल्या कबड्डी स्पर्धेचे सामने पाहायला दोन हजारांपेक्षा अधिक कबड्डीप्रेमींची गर्दी उसळली होती. ही गर्दी पाहून कबड्डीपटूंचाही उत्साह द्विगुणित झाला होता.
Read- नाबाद ९५ धावा करुनही केएल राहुलच्या नावावर झाला नकोसा असा विक्रम
साईनाथ आणि ब्राह्मणदेव यांच्यातला सामना मध्यंतराला 17-17 असा बरोबरीत थांबला होता. ब्राह्मणदेवच्या अमोल गावडे, साईनाथ मोहिते आणि ओम साईनाथच्या सागर आगटे आणि सर्वेश लाड यांच्या आक्रमक खेळामुळे काँटे की टक्कर पाहायला मिळाली.
दोन्ही संघांचा गुणफलक समांतर चालला होता. सामना संपायला सहा मिनीटे असताना साईनाथवर दुसरा लोण पडला आणि येथेच साईनाथ मागे पडली. मग जय ब्राह्मणदेवने 33-27 अशी बाजी मारली.








