दिल्ली कॅपिटल्सचा आक्रमक सलामीवीर जेक फ्रेझर मॅकगर्कनं मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक ठोकलं. यासह त्यानं आयपीएल 2024 मध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याच्या स्वतःच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. मॅकगर्कनं यापूर्वी या हंगामात सनरायझर्स हैदराबादविरुद्धही 15 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं.
जेक फ्रेझर मॅकगर्कनं मुंबई इंडियन्सविरुद्ध चौथ्या षटकातच अर्धशतक पूर्ण केलं. यासह तो टी20 क्रिकेटमध्ये 15 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत दोनदा अर्धशतक ठोकणारा तिसरा फलंदाज बनला आहे. त्याच्याआधी वेस्ट इंडिजच्या आंद्रे रसेल आणि सुनील नारायण यांनी ही कामगिरी केली आहे.
अर्धशतक पूर्ण करताना मॅकगर्कनं 7 चौकार आणि 3 गगनचुंबी षटकार लगावले. एकवेळ तो क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक ठोकतो की काय, असं वाटत होतं. मात्र तो 27 चेंडूत 84 धावा करून बाद झाला. आपल्या या खेळीत त्यानं 11 चौकार आणि 6 षटकार लगावले.
जेक फ्रेजर मॅकगर्कनं चालू मोसमात आतापर्यंत 104 चेंडू खेळले आहेत. या दरम्यान त्यानं 22 चौकार आणि 22 षटकार हाणले आहेत. या आकडेवारीच्या आधारे पाहिलं तर लक्षात येतं की, मॅकगर्कनं प्रत्येक 5 चेंडूत 2 चौकार मारले आहेत. याच सामन्यात मॅकगर्कनं जसप्रीत बुमराहच्या एका षटकात 18 धावा ठोकल्या. आयपीएल 2024 मधील बुमराहचं हे सर्वात महागडं षटक ठरलं आहे.
आयपीएल 2024 मध्ये जेक फ्रेझर मॅकगर्क नंतर सनरायझर्स हैदराबादच्या दोन फलंदाजांनी सर्वात जलद अर्धशतक झळकावलं आहे. सनरायझर्स हैदराबादचे दोन्ही सलामीवीर अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी चालू मोसमात 16 चेंडूत 50 धावा केल्या आहेत. ट्रॅव्हिस हेडनं या मोसमात 18 चेंडूतही अर्धशतक झळकावलं आहे. मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादवही या लिस्टमध्ये मागे नाही. त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध अवघ्या 17 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
पृथ्वी शॉचं करिअर धोक्यात? खराब फॉर्ममुळे दिल्ली कॅपिटल्सनं दाखवला प्लेइंग 11 मधून बाहेरचा रस्ता
दिल्लीविरुद्ध मुंबई इंडियन्सची प्रतिष्ठा पणाला, दोन्ही संघांच्या प्लेइंग 11 मध्ये बदल; जाणून घ्या