दिल्ली कॅपिटल्सचा युवा सलामीवीर जेक फ्रेझर-मॅकगर्कनं आयपीएल 2024 मधील आपला खतरनाक फॉर्म सुरू ठेवला आहे. मॅकगर्कनं मंगळवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध 20 चेंडूत तुफानी 50 धावा ठोकल्या. आपल्या या खेळीत त्यानं 7 चौकार आणि 3 षटकार हाणले. या सामन्यात मॅकगर्कनं अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. चालू मोसमातील ही त्याची चौथी अर्धशतकी खेळी आहे.
ऑस्ट्रेलियाच्या 22 वर्षीय मॅकगर्कनं चौथे षटक टाकण्यासाठी आलेल्या आवेश खानविरुद्ध 28 धावा ठोकल्या. त्यानं पहिल्या तीन चेंडूंवर चौकार आणि चौथ्या चेंडूवर लाँग ऑफच्या दिशेनं षटकार ठोकला. मॅकगर्कनं पाचव्या चेंडूवर डीप कव्हरच्या दिशेनं चौकार आणि शेवटच्या चेंडूवर लाँग ऑनला षटकार ठोकला. मॅकगर्कनं तिसऱ्या षटकात वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टविरुद्ध दोन चौकार आणि एक षटकार ठोकला होता. या स्फोटक खेळीसनं त्यानं एक अप्रतिम विक्रम आपल्या नावावर केला आहे.
आयपीएलमध्ये 20 पेक्षा कमी चेंडूत 3 अर्धशतकं झळकावणारा मॅकगर्क हा पहिला खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे, त्याचा हा पहिलाच आयपीएल सीझन आहे. त्यानं पहिला आयपीएल सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध खेळला होता. या सामन्यात त्यानं 55 धावा केल्या. मॅकगर्कनं सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध अनुक्रमे 65 आणि 84 धावा केल्या. या दोन्ही सामन्यात त्यानं 15-15 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं.
आयपीएलमध्ये 20 पेक्षा कमी चेंडूत सर्वाधिक अर्धशतक
3 – जेक फ्रेझर-मॅकगर्क
2- यशस्वी जैस्वाल
2 – निकोलस पूरन
2- ईशान किशन
2 – सुनील नारायण
2 – कायरन पोलार्ड
2 – ट्रॅव्हिस हेड
2- केएल राहुल
या सामन्यात मॅकगर्क 20 चेंडूत 50 धावा करून बाद झाला. त्याला आर अश्विननं पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बाद केलं. मात्र तोपर्यंत या युवा फलंदाजानं त्याचं काम केलं होतं. मॅकगर्कनं अभिषेक पोरेलसोबत पहिल्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. पोरेलनं 36 चेंडूंत 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 65 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
डॅरेल मिशेलनं सरावादरम्यान फोडला चाहत्याचा फोन, मग अशी केली भरपाई; पाहा व्हायरल VIDEO
दिल्लीविरुद्ध संजू सॅमसननं जिंकला टॉस, प्रथम गोलंदाजी करणार; जाणून घ्या प्लेइंग 11