सेन्च्यूरियन। गुरुवारपासून दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघात पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामना इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनसाठी खास ठरला आहे.
हा त्याचा 150 वा कसोटी सामना आहे. त्यामुळे 150 किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामने खेळणारा पहिलाच वेगवान गोलंदाज बनला आहे. तसेच जगातील एकूण 9 वा क्रिकेटपटू ठरला आहे.
अँडरसनने या सामन्यातून दुखापतीनंतर इंग्लंड संघात पुनरागमन केले आहे. याआधी तो शेवटचा सामना ऑगस्टमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍशेस मालिकेत खेळला होता. विशेष म्हणजे अँडरसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुनरागमन करताना पहिल्याच चेंडूवर डीन एल्गारला बाद केले.
सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या वेगवान गोलंदाजांमध्ये अँडरसन पाठोपाठ त्याचा संघसहकारी स्टुअर्ट ब्रॉड आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेला कसोटी सामना ब्रॉडचा 135 वा कसोटी सामना आहे. वेस्ट इंडीजचा माजी वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्श 132 कसोटी सामन्यांसह तिसर्या क्रमांकावर आहे.
सर्वाधिक कसोटी सामने खेळणारे क्रिकेटपटू –
200 – सचिन तेंडूलकर
168 – रिकी पॉटिंग
168 – स्टिव्ह वॉ
166 – जॅक कॅलिस
164 – शिवनारायण चंद्रपॉल
164 – राहुल द्रविड
161 – ऍलिस्टर कूक
156 – ऍलेन बॉर्डर
150 – जेम्स अँडरसन
149 – माहेला जयवर्धने






