ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सध्या ऍशेस मालिकेतील (ashes series) दुसरा सामना ऍडिलेडमध्ये खेळला जात आहे. उभय संघातील दुसऱ्या सामन्याची सुरुवात १६ डिसेंबरला (गुरुवारी) झाली. ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या सुरुवातील नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने मोठी धावसंख्या केली. इंग्लंडच्या पहिल्या डावाची सुरुवाता सामन्याच्या दुसऱ्या दिवशी झाली आणि तिसऱ्या दिवशी संघ सर्वबाद झाला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (james anderson) मात्र नाबाद राहिला आणि स्वतःच्या नावावर नवीन विक्रमाची नोंद केली.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ९ विकेट्सच्या नुकसानावर ४७३ धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात २३६ धावा केल्या आणि संघ सर्वबाद झाला. इंग्लंडचा एकमेव खेळाडू जेम्स अँडरसन पहिल्या डावात ५ धावा करून नाबाद राहिला. अँडरसनने या डावात मोठी धावसंख्या केली नसली, तरी एका खास विक्रमाची नोंद केली आहे. अँडरसन कसोटी क्रिकेटमधील असा खेळाडू आहे, जो सर्वाधिक वेळा नाबाद राहिला आहे. दरम्यान, ही १०० वी वेळ आहे, जेव्हा तो कसोटी सामन्यात नाबाद राहिला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये १०० वेळा नाबाद खेळी करणारा तो पहिलाच खेळाडू आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा नाबाद खेळी करणाऱ्यांचा विचार केला, तर अँडरसन या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने हा पराक्रम तब्बल १०० वेळा केला आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडीजचे कर्टनी वॉल्श आहेत. जे कसोटी क्रिकेटमध्ये ६१ वेळा नाबाद राहिले होते. श्रीलंका संघाचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन हा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुरलीधरन कसोटी कारकिर्दीत ५६ वेळा नाबाद राहिला होता. यादीत चौथ्या क्रमांकावर इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू बॉब विलीस आहेत. त्यांनी कसोटी कारकिर्दीत ५५ वेळा नाबाद खेळी केली आहे. तर पाचव्या क्रमांकावर न्यूझीलंडचा क्रिस मार्टिन आहे, जो कसोटीमध्ये ५२ वेळा नाबाद राहिला आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात इंग्लंडवर मोठी आघाडी घेतली आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने त्यांच्या दुसऱ्या डावात ४५ धावा केल्या आहेत आणि १ विकेट देखील गमावली आहे. सलामीवीर डेविड वॉर्नर १३ धावा करून तंबूत परतला आहे. ऑस्ट्रेलिया सध्या २८२ धावांनी आघाडीवर आहे.
महत्वाच्या बातम्या –
रोहित शर्माला टीम इंडियाचा वनडे कर्णधार करण्याचा निर्णय ‘या’ ४ कारणांमुळे चुकीचा
भारीच ना! रोहित शर्मासाठी २०२१ वर्ष ठरलं धमाकेदार, ‘या’ आहेत ५ उत्कृष्ट खेळी