ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक मालिका विजय मिळवल्यानंतर भारतीय संघासमोर मायदेशात इंग्लंड संघाचे आव्हान असणार आहे. 5 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात इंग्लंड संघ बहुचर्चित 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघाला विजयाचा दावेदार मानले जात असले तरी, नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंका दौऱ्यात इंग्लंडने शानदार कामगिरी करत 2-0 ने विजय मिळवला होता. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये जबरदस्त संघर्ष बघायला मिळणार हे ठरलेले आहे.
भारतीय संघाला इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणासाठी योग्य रणनीती आखावी लागेल. इंग्लंडकडे जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड व जोफ्रा आर्चर हे 3 शानदार वेगवान गोलंदाज आहेत. पण या तिघांमध्ये जेम्स अँडरसन हा सर्वाधिक घातक ठरू शकतो अशी प्रतिक्रिया इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉंटी पानेसर याने दिली आहे. पानेसरच्या मते अँडरसनला भारतीय फलंदाजांविरुद्ध गोलंदाजी करण्याचा अनुभव आहे व तो उत्तम कामगिरी करू शकतो.
भारताविरुद्ध घेतल्यात 100 हून अधिक धावा
पानेसरच्या मताशी आकडेदेखील सहमत आहेत. अँडरसन भारताविरुद्ध सर्वाधिक बळी मिळवणारा इंग्लंडचा गोलंदाज आहे. अँडरसनने भारताविरुद्ध 27 कसोटी सामन्यात तब्बल 110 बळी मिळवले आहेत. यात 20 धावा देत 5 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांना आगामी मालिकेत अँडरसन विरुद्ध उत्तम फलंदाजी करावी लागणार आहे.
फेब्रुवारीत भिडणार भारत-इंग्लंड संघ
आगामी काळात इंग्लंड संघ भारताच्या दौऱ्यावर 4 कसोटी, 5 टी20 व 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 5 फेब्रुवारी पासून चेन्नई येथे होणाऱ्या कसोटी सामन्याने होणार आहे. दोन्ही संघ उत्तम फॉर्ममध्ये असल्याने ही मालिका उत्कंठावर्धक होण्याची सर्व क्रिकेटप्रेमींना अशा असणार आहे. भारतासाठी या मालिकेत नियमित कर्णधार विराट कोहलीसह अनेक महत्त्वाचे खेळाडू पुनरागमन करणार आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या मालिकेत भारतीय संघ उत्तम कामगिरी करेल अशी सर्वांना आशा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
खराब फॉर्ममध्ये असलेल्या पृथ्वीला ‘हा’ मुंबईकर देणार फलंदाजीचे धडे
IPL 2021: भज्जीचा सीएसके सोबतचा प्रवास संपला, पण ‘हे’ ३ संघ बोली लावण्यास असतील उत्सुक
“तो कायम माझ्या ऑल-टाईम इलेव्हनमध्ये असेल” भारताच्या दिग्गज फिरकीपटूने केले पुजाराचे कौतुक