इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यान झालेल्या दुसऱ्या कसोटीत लॉर्ड्स मैदानावर भारतीय संघाने ऐतिहासिक विजय प्राप्त केला. भारतीय संघाने इंग्लंडला १५१ धावांच्या मोठ्या फरकाने धूळ चारत मालिकेमध्ये १-० ने आघाडी मिळवली. दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळ केल्याने सामन्याचा निर्णय शेवटच्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात लागला. मागील तीन दौऱ्यातील हा भारताचा केवळ तिसरा विजय ठरला. या तिन्ही विजयावेळी मात्र एक वेगळाच योगायोग पाहायला मिळाला.
सात वर्षात तिसरा विजय
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने लॉर्ड्स कसोटी आपल्या नावे करत सलग तिसऱ्या दौर्यात इंग्लंडमध्ये विजय मिळवण्याची कामगिरी केली. २०१४ दौऱ्यावेळी भारतीय संघाने आपला एकमेव विजय देखील याच लॉर्ड्स मैदानावर मिळवला होता. त्यानंतर, २०१८ दौर्यात नॉटिंघम कसोटीत भारताने विजय साजरा केलेला. विशेष म्हणजे या तिन्ही विजयावेळी एक वेगळाच योगायोग पाहायला मिळाला.
भारताच्या विजयाचे अँडरसन कनेक्शन
भारतीय संघाने मिळवलेल्या या सर्व विजयात इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचे कनेक्शन राहिले आहे. भारताच्या या तीनही विजयावेळी इंग्लंडचा अखेरचा बाद होणारा फलंदाज नेहमी जेम्स अँडरसन हाच राहिला. २०१४ लॉर्ड्स विजयावेळी अँडरसन याला रवींद्र जडेजाने धावबाद केलेले. त्यानंतर नॉटिंघम कसोटी विजयात रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर त्याने रवींद्र जडेजाकडे झेल सोपविलेला. सोमवारी संपन्न झालेल्या सामन्यात देखील अँडरसनलाच त्रिफळाचीत करत मोहम्मद सिराजने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
हेडिंग्लेमध्ये असेल पुढील सामना
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात खेळला गेलेला मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. मात्र, दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजयाची नोंद केली. यानंतर, आता मालिकेचा तिसरा सामना हेडिंग्ले ओव्हलच्या मैदानावर २५ ऑगस्टपासून खेळला जाईल. भारत या सामन्यांमध्ये विजय मिळवून प्रथमच इंग्लंडमध्ये एकापेक्षा जास्त कसोटी जिंकण्याचा पराक्रम करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताचं काय घेऊन बसलाय, इंग्लंडच्या वृत्तपत्रातही भारताच्या विजयाचा डंका; ‘फ्रंटपेज’वर झळकली बातमी
लॉर्ड्स कसोटीचा पराभव इंग्लंडच्या जिव्हारी, तिसऱ्या सामन्यासाठी ‘या’ विस्फोटक फलंदाजांला बोलावणार!
नव्या कसोटी क्रमवारीत रूटची बल्लेबल्ले, तर भारतीय खेळाडूंना…