भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटी रद्द कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली. संघातील खेळाडू हा सामना खेळण्यासाठी मानसिकरीत्या तयार नसल्याचे कारण देत भारतीय संघाने हा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाच्या या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली तर, काहींनी भारतीय खेळाडूंचे समर्थन केले. आता यात इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनची भर पडली असून, त्याने एक भावनिक पोस्ट केली.
ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी लाजीरवाणी गोष्ट
इंग्लंडचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने मँचेस्टर कसोटी रद्द झाल्यानंतर इंस्टाग्रामवर एक भावनिक पत्र लिहिले.
त्याने लिहिले, ‘ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या हंगामाचा शेवट असा व्हावा. लँकेशायरमधील सर्व अस्वस्थ लोकांसोबत मी आहे. ज्यांनी या सामन्यासाठी तिकिटे खरेदी केली, प्रवास केला, हॉटेल बुक केली. हे सर्व चाहते या मालिकेचा योग्य शेवट पाहू इच्छित होते. मला आशा आहे की, हा सामना पुन्हा खेळला जाईल आणि मला माझ्या घरच्या मैदानावर आणखी एक आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळेल. या मैदानावर मी खूप प्रेम करतो.’
https://www.instagram.com/p/CTuHayeo3Dc/
मालिकेत अँडरसनची दमदार कामगिरी
जेम्स अँडरसनने भारताविरुद्धच्या मालिकेतील चारही सामन्यात सहभाग नोंदवला. त्याने या चार सामन्यात मिळून ८ डावांमध्ये गोलंदाजी करताना १५ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. भारतीय कर्णधार विराट कोहलीला यापैकी दोन डावात बाद करण्यात तो यशस्वी ठरला. त्याच्यापेक्षा अधिक बळी केवळ ओली रॉबिन्सन (२१) व जसप्रीत बुमराह (१५) यांनी मिळवले.
पाचवी कसोटी झाली रद्द
पाचव्या कसोटीआधी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री व सहाय्यक फिजिओ योगेश परमार हे कोरोना बाधित आढळून आले होते. त्यामुळे, अखेरची कसोटी खेळली जाणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली होती. सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी नकारात्मक आल्यानंतर कसोटी सुरू होईल अशी आशा व्यक्त केली गेली. मात्र, भारतीय खेळाडूंनी संभाव्य धोका न पत्करता कसोटी न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उभय देशांचे क्रिकेट बोर्ड आमने-सामने आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
मँचेस्टर कसोटी रद्द होण्यास भारतीय संघाचा दोष नाही, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे भाष्य
तयारी आयपीएलची! वॉर्नरने क्लारंटाईन असतानाही हॉटेलरूममध्येच सुरू केली प्रॅक्टिस, पत्नीची खास कमेंट
‘हे’ आहेत कसोटीत आठव्या क्रमांकावर दोन्ही डावात ५० पेक्षा जास्त धावांची खेळी करणारे ४ भारतीय फलंदाज