न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघात ३ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना लॉर्ड्स येथे गुरुवारपासून (०२ जून) खेळवला जात आहे. या यामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंडचा डाव १३२ धावांवरच आटोपला. इंग्लंडकडून ३९ वर्षीय जेम्स अंडरसन याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. यासह त्याने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
अंडरसनने (James Anderson) वेगवान गोलंदाज म्हणून एका डावात सर्वाधिकवेळा ४ विकेट्स (Four Wickets Haul) घेण्याच्या विक्रमात संयुक्तपणे अव्वलस्थान काबीज केले आहे. त्याने न्यूझीलंडचे महान वेगवान गोलंदाज रिचर्ड हेडली (Richard Hadley) यांची बरोबरी केली (James Anderson Equals Richard Hadley) आहे.
जेम्स अंडरसनचे न्यूझीलंडला धक्क्यावर धक्के
अंडरसनने या सामन्यात १६ षटके गोलंदाजी करताना ६६ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याने ६ निर्धाव षटकेही टाकले. न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंगला १ धावेवर बाद करत अंडरसनने डावाची सुरुवात केली. त्यानंतर त्याने टॉम लाथम (१ धाव), कायल जेमीसन (६ धावा) आणि टीम साउदी (२६ धावा) यांच्या विकेट घेतल्या.
अंडरसनने रिचर्ड हेडलींची केली बरोबरी
अशाप्रकारे एका डावात ४ विकेट्स घेत अंडरसनने वेगवान गोलंदाज म्हणून सर्वाधिक वेळा एका डावात ४ विकेट्स घेण्याच्या विक्रमात हेडलींशी बरोबरी साधली आहे. हेडली आणि अंडरसनने सर्वाधिक ६१ वेळा एका कसोटी डावात ४ विकेट्स घेण्याची किमया साधली आहे. आता दुसऱ्या डावात पुन्हा एकदा हा पराक्रम करत हेडलींना मागे टाकण्याची संधी अंडरसनकडे असेल.
अंडरसन आणि हेडलींव्यतिरिक्त ग्लेन मॅकग्राने ५७ वेळा एका कसोटी डावात ४ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच कर्टनी वॉल्श (५४ वेळा), डेल स्टेन (४३ वेळा), वखार यूनिस (५० वेळा) ही कामगिरी केली होती.
पहिल्या कसोटी सामन्याची स्थिती
दरम्यान इंग्लंड आणि न्यूझीलंड संघात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळत आहे. प्रथम फलंदाजी करताना पाहुणा न्यूझीलंडचा संघ १३२ धावांवरच गारद झाला. न्यूझीलंडकडून कॉलिन डी ग्रँडहोमने सर्वाधिक ४२ धावा केल्या. तसेच टीम साउदीने २६ धावा जोडल्या. इतर कोणत्याही खेळाडूला २० धावांचा आकडाही गाठता आला नाही. कर्णधार केन विलियम्सनने तर २ धावांवर विकेट गमावली. या डावात इंग्लंडकडून जेम्स अंडरसन आणि पदार्पणवीर मॅटी पॉट्सने प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात इंग्लंडच्या फलंदाजांनीही न्यूझीलंडच्या गोलंदाजांपुढे नांग्या टाकल्या. सलामीवीर झॅक क्राउले (४३ धावा) आणि ऍलेक्स लीस (२५ धावा) यांच्याव्यतिरिक्त इतर कोणताही फलंदाज २० धावांपर्यंत पोहोचू शकला नाही. पहिल्या दिवसाखेर इंग्लंडचा संघ ३६ षटकात ७ बाद ११६ धावांवर खेळत आहे. बेन फोक्स आणि स्टुअर्ट ब्रॉड फलंदाजी करत आहेत.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कौतुक करावे तितके कमीच! बेन स्टोक्स ‘थोर्प’ नावाची जर्सी घालून उतरला मैदानात, कारण अभिमानास्पद
जेव्हा स्टुअर्ट बिन्नीने वनडेत केवळ ४ धावा देत घेतल्या होत्या ६ विकेट्स, पाहा व्हिडिओ