इंग्लंड विरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये भारतीय संघाची सुरुवात अत्यंत दमदार राहिली. पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट प्रदर्शन करत यजमान इंग्लंड संघाला १५१ धावांनी पराभूत केले. भारतीय संघाने या मालिकेत १-० ने आघाडी मिळवली.
यादरम्यान लॉर्ड्सवरील दुसरा कसोटी सामना चौथ्या दिवसापर्यंत इंग्लंडच्या हातात होता. मात्र, इंग्लंडचा कर्णधार जो रूटने शेवटच्या दिवशी केलेल्या नेतृत्वामुळे इंग्लंडला पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघातील शेवटच्या फळीतील खेळाडू शमी-बुमराह यांच्या जोडीने ९ व्या विकेटसाठी तब्बल ८९ धावा जोडल्या.
ज्यामुळे भारतीय संघाने सामन्यात पुनरागमन केले. तसेच भारतीय गोलंदाजांनी देखील इंग्लिश फलंदाजांवर वर्चस्व राखत निर्णय आपल्या बाजूने वळवला. यानंतर इंग्लंड संघासोबतच जो रूटवर देखील टीकास्त्र सोडण्यात येऊ लागले. अनेक माजी क्रिकेटपटूंनी रूटच्या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त करत त्याला फटकारले होते.
यातच आता इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने देखील जो रूट बाबत वक्तव्य केले आहे. ‘टेलेंडर्स पॉडकास्ट’मध्ये बोलताना अँडरसन म्हणाला, “ज्यावेळी जो रूटकडून नेतृत्वामध्ये चूक झाली. त्यातील एक चूक माझ्यामते ही होती की, बुमराह ज्यावेळी फलंदाजीसाठी आला, तेव्हा रूटने माझ्या ऐवजी मार्क वूडला गोलंदाजी करायला दिली. याच ठिकाणी रूट भावनिक झाला. रूटने बुमराहला आउट करण्याऐवजी त्याने केलेल्या गोलंदाजीचा बदला घेण्याचा प्रयत्न केला. अशावेळी रूटने मला गोलंदाजीसाठी कायम ठेवायला हवे होते. मात्र तसे न होता कर्णधाराने वूडला गोलंदाजी करण्यास दिले.”
बुमराहने केलेल्या गोलंदाजीबद्दलही अँडरसनने मत व्यक्त केले, बुमराहने एका षटकात अँडरसनला जवळपास १० चेंडू फेकले. ज्यातील जास्त तर बाउन्सर होते. या घटनेनंतर दोन्ही खेळाडूंमध्ये शाब्दिक वाद देखील झाला होता.
याबाबत बोलताना अँडरसन म्हणाला, “ज्यावेळी मी फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलो. तेव्हा रूटने आणि इतर फलंदाजांनी मला खेळपट्टी स्लो असल्याचे सांगितले होते. तसेच बुमराहच्या गोलंदाजीतील गती देखील संथ असल्याचे सांगितले होते. मात्र, बुमराहने मला तब्बल ९० मीलच्या वेगाने गोलंदाजी केली होती. यामुळे मी खूप आश्चर्यचकीत झालो होतो. माझ्या पूर्ण कारकीर्दीत याआधी मी असा अनुभव कधीच घेतला नव्हता. त्यामुळे मला वाटत होते की बुमराह मला बाद करण्याचा प्रयत्नच करत नव्हता.”
याबाबत पुढे बोलताना अँडरसन म्हणाला, “बुमराहने त्या षटकात १०-१२ चेंडू फेकले होते. ज्यामध्ये शॉर्ट आणि नोबॉलचा भरणा होता. माझ्या अंदाजे त्याने केवळ २ चेंडू स्टंपमध्ये टाकले होते. ज्याला खेळण्यात मी यशस्वी झालो.”
त्यानंतर इंग्लंडच्या संघाने देखील भारताविरुद्ध हीच रणनीती आखली होती. मात्र, भारतीय संघाने इंग्लिश गोलंदाजीला चांगले उत्तर दिले. तसेच शेवटच्या दिवसापर्यंत गेलेला हा सामना भारताच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे भारतीय संघाने जिंकला.
दरम्यान, इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्ट पासून हेडींग्लेच्या मैदानावर होणार आहे. त्यासाठी दोन्ही संघांची जोरदार तयारी चालू झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–तुम्ही स्लेजिंगवर लक्ष केंद्रित करत आहात का? अजिंक्य रहाणेने दिले ‘असे’ उत्तर
–क्रिकेटवर कोरोनाची पुन्हा वक्रदृष्टी! न्यूझीलंडच्या धडाकेबाज सलामीवीराचा अहवाल आला पॉझिटिव
–लीग स्पर्धांमध्ये कोचिंग करणाऱ्या जयवर्धनेला राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक बनण्याची इच्छा नाही, ‘हे’ आहे कारण