वेस्ट इंडिजचा संघ जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. तेथे या दोन संघांमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाईल. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना 10 जुलैपासून खेळला जाणार आहे.
इंग्लडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनसाठी हा कसोटी सामना संस्मरणीय असेल, कारण हा त्याच्या दीर्घ कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना असणार आहे. या सामन्यानंतर अँडरसन क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. मात्र अँडरसनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण जेम्स अँडरसनचा इंग्लंड संघासोबतचा प्रवास येथेच संपणार नाही!
निवृत्तीनंतरही अँडरसन इंग्लंड संघासोबतच राहणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांमध्ये तो इंग्लंड संघाला सल्ला देत राहील. यानंतर तो श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत बॅकस्टाफ सदस्य म्हणून संघासोबत राहणार आहे. इंग्लंड क्रिकेटचे व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांनी अँडरसनच्या नव्या भूमिकेची पुष्टी करताना सांगितलं की, “अँडरसनकडे इंग्लंड क्रिकेटला देण्यासारखं खूप काही आहे. त्याचा अनुभव वाया जाऊ नये अशी आमची इच्छा आहे. तो संपूर्ण उन्हाळ्यात आमच्यासोबत असेल. तो खूप चांगला आहे आणि ही भूमिका साकारण्यात त्याला रस आहे.”
रॉब की पुढे म्हणाले, “अँडरसनला गोलंदाजीचा खूप अनुभव आहे, परंतु त्यानं अद्याप कोणत्याही संघाला गोलंदाजी कशी करायची हे शिकवलं नाही. तो या भूमिकेचा किती आनंद घेतो हे पाहण्याची आम्हाला चांगली संधी मिळाली आहे. लॉर्ड्स कसोटीनंतर जेम्स अँडरसनसारख्या खेळाडूनं क्रिकेटशी जोडलं जाण्याचा निर्णय घेतला तर इंग्लंड क्रिकेटसाठी ती आनंदाची बाब असेल.”
41 वर्षीय जेम्स अँडरसननं इंग्लंडसाठी 187 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं 2.79 च्या इकॉनॉमीसह 700 विकेट्स घेतल्या आहेत. तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
वर्ल्ड कप जिंकल्यानंतर खेळपट्टीची माती का चाखली? रोहित शर्मानं स्वत: केला खुलासा
या आयपीएल खेळाडूंची लागली लाॅटरी, झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात समावेश
बॅडमिंटन कोर्टवर अचानक हार्ट अटॅक आला, तरुण खेळाडूचा तडफडून मृत्यू; VIDEO व्हायरल