क्रिकेटला “जेंटलमन्स गेम” म्हटले जाते, परंतु कधीकधी काही क्रिकेटपटू मैदानावर अशी कृती करतात की क्रिकेटला लावलेल्या या विशेषणावर प्रश्नचिन्ह उभे राहते. सामन्यादरम्यान विरोधी खेळाडूला एखाद्या विशिष्ट आकड्याला स्पर्श करण्यापासून रोखण्यासाठी खेळाडू काही विचित्र गोष्टी करतात हे यापूर्वीही बर्याचदा पाहिले गेले आहे. बिग बॅश लीगमध्ये जेम्स व्हिन्स व अँड्र्यु टाय यांच्यात अशाच प्रकारचा प्रसंग उद्भवला. त्याबाबत आता स्वतः व्हिन्सने पुढे येऊन प्रतिक्रिया दिली आहे.
टायने दाखवली होती अखिलाडूवृत्ती
सिडनी सिक्सर्स आणि पर्थ स्कॉर्चर्स यांच्यात बिग बॅश लीगच्या क्वालिफायर सामन्यादरम्यान अखिलाडू वृत्तीचे दर्शन घडले. शनिवारी (३० जानेवारी) रोजी कॅनबेरा येथील मनुका ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात सिडनी सिक्सर्सचा फलंदाज जेम्स व्हिन्स शतकाच्या अगदी जवळ असताना पर्थचा गोलंदाज अँड्र्यू टायने वाइड चेंडू टाकून शतक ठोकू दिला नाही. टायच्या या कृत्यानंतर सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले.
व्हिन्सने दिली प्रतिक्रिया
टायने सिक्सर्सला विजयासाठी १ व व्हिन्सला शतकासाठी दोन धावा हव्या असताना वाईड चेंडू टाकून सामना संपवला. ९८ धावांवर नाबाद राहिलेल्या व्हिन्सने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले, “या प्रकरणात मला कोणावरही बोट करायचे नाही. त्याने तो आखूड टप्प्याचा चेंडू टाकला, त्याच्या दृष्टीने ते बरोबर होते. मला आशा आहे की, त्याने कोणत्याही वाईट हेतूने ही कृती केली नाही. टायला चांगल्या पद्धतीने माहित असेल की, हे जाणीवपूर्वक केले गेले आहे की नाही. मी शतक केले असते तर बरे झाले असते. मात्र, संघ अंतिम फेरीत गेल्याचा आनंद आहे.”
यापूर्वीही घडली आहे अशी घटना
क्रिकेटच्या मैदानावर कोणत्याही क्रिकेटरकडून अशाप्रकारची झालेली ही पहिली कृती नाही. यापूर्वी, भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज सूरज रणदीवनेदेखील जाणीवपूर्वक वाइड चेंडू टाकल्याने माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवागला शतकापासून रोखले होते.
महत्वाच्या बातम्या:
ब्रेकिंग! बडोद्याचा पराभव करत तामिळनाडूने जिंकली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी
आयएसएल २०२०-२१ : एटीके मोहन बागानचा ब्लास्टर्सवर पिछाडीवरून विजय
खुशखबर! चेन्नईतील दुसऱ्या कसोटी सामन्यात इतक्या प्रेक्षकांना मिळणार मैदानात प्रवेश