जम्मू-काश्मीर क्रिकेटसाठी २०२५-२६ हंगाम अविस्मरणीय ठरला आहे. त्यांनी या हंगामात रणजी ट्रॉफीचे विजेतेपद जिंकत इतिहास रचला आहे. कर्नाटक विरुद्ध जम्मू आणि काश्मीर हा रणजी ट्रॉफी २०२५-२६चा अंतिम सामना हुबळीमध्ये खेळला गेला. (२४ ते २८ फेब्रुवारी) पाचव्या दिवसापर्यंत खेळण्यात आलेल्या या सामन्याच्या दुसऱ्या डावात जम्मू-काश्मीरने फलंदाजी करत ५५०पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली होती. यावेळी त्यांचा सलामीवीर कामरान इक्बालने जबदरदस्त खेळी केली.
अंतिम सामन्याच्या अंतिम दिवशी दिडशतकी खेळी करत इक्बालने उल्लेखनीय कामगिरी केली. यामध्ये विशेष असे की त्याला सामन्याच्या काही तासापूर्वीच संघात घेतले गेले. जम्मू-काश्मीरने निश्चित केलेला सलामीवीर शुभम खजूरिया दुखापतग्रस्त झाला होता, त्यामुळे त्याच्याजागी इक्बालला संधी मिळाली. त्यासाठी तो दिल्लीहून रात्री ११.३०ला विमानाने मुंबईला रवाना झाला. तो मुंबईला रात्री एक वाजून ५५ मिनिटांनी पोहोचला आणि ४ तासानंतर हुबळीला पोहोचला. या मोठ्या प्रवासामुळे तो नाणेफेकीच्या केवळ ३० मिनिटांआधी मैदानावर पोहोचला. तो पहिल्या डावात अपयशी ठरला. त्याची उणीव त्याने दुसऱ्या डावात नाबाद १६० धावांची खेळी करत भरून काढली.
इक्बालने १८९ चेंडूत १०० धावा पूर्ण केल्या होत्या. हे त्याचे प्रथम श्रेणीतील दुसरेच शतक ठरले आहे. अचानक संघात येताच संघाला विजेतेपदाजवळ पोहोचवण्याचे काम त्याने चोखपणे पार पाडले.
या सामन्यात जम्मू-काश्मीरचा कर्णधार पारस डोग्राने नाणेफेक जिंकले आणि प्रथम फलंदाजी केली. त्यामध्ये शुभम पुंडीरच्या १२१ धावांमुळे जम्मू-काश्मीरने पहिल्या डावात सर्व विकेट्स गमावत ५८४ धावा केल्या होत्या. त्याबदल्यात कर्नाटकचा पहिला डाव २९३ धावांवरच संपला आणि जम्मू-काश्मीरला २९१ धावांची आघाडी मिळाली.
जम्मू-काश्मीरने दुसऱ्या डावात इक्बालच्या खेळीने ४ विकेट्स गमावत ३४२ धावा केल्या. तेव्हा इक्बाल १६० धावा आणि साहिल लोटरा १०१ धावा करत नाबाद राहिले. त्यानंतर जम्मू-काश्मीरचा कर्णधार पारस डोग्रा आणि कर्नाटकचा कर्णधार देवदत्त पड्डीकलने एकमताने सामना ड्रॉ केला. नियमानुसार जो संघ पहिल्या डावात आघाडी घेतो तो संघ विजेता घोषित केला जातो. यामुळे जम्मू-काश्मीर विजेता ठरला.






