जम्मू-काश्मीरचा पॅरा क्रिकेटर आमिर हुसैन लोन सध्या फार चर्चेत आहे. तो इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) च्या उद्घाटनाच्या सामन्यात खेळताना दिसला होता.
या सामन्यात आमिर सचिन तेंडुलकरची टीम ‘मास्टर्स इलेव्हन’चा भाग होता. यावेळी आमिरनं सचिनची 10 नंबरची जर्सी घालून फलंदाजी केली. तर सचिन या दिव्यांग क्रिकेटरची जर्सी परिधान करताना दिसला. 34 वर्षीय आमिर हुसैन लोनची गोलंदाजी पाहून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर खूप प्रभावित झाला. सचिननं आमिरला ‘खरा लेग स्पिनर’ म्हटलंय.
अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहारा गावात राहणाऱ्या आमिर हुसैनची कहाणी खूपच प्रेरणादायी आहे. वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी आमिरचे दोन्ही हात सॉ मशीननं (लाकूड कापण्याचे यंत्र) कापले गेले. त्या दु:खद घटनेमुळे आमिरचं जीवन असहाय झालं होतं. दरम्यान, आमिरला क्रिकेट खेळण्याचं वेड लागलं. आमिरनं दोन्ही हात गमवले असल्यानं त्यानं गळ्यात आणि खांद्यावर बॅट अडकवून फलंदाजी सुरू केली. तसेच त्यानं पायाच्या बोटांच्या सहाय्यानं चेंडू फेकण्यास सुरुवात केली.
कालांतरानं आमिर हुसैनची निवड स्थानिक अपंग संघात आणि त्यानंतर जम्मू-काश्मीरच्या पॅरा क्रिकेट संघात झाली. 2013 मध्ये, जम्मू आणि काश्मीरच्या पॅरा टीमनं केरळ विरुद्ध दिल्लीत सामना खेळला होता. या सामन्यात आमिरनं आपल्या कामगिरीनं सर्वांनाच प्रभावित केलं होतं.
या वर्षी जेव्हा आमिरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा व्हिडिओ पाहून सचिन तेंडुलकरही प्रभावित झाला. सचिननं त्याच्या ‘X’ अकाउंटवर पोस्ट करून आमिरला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. सचिन नुकताच जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर गेला होता. तेव्हा त्यानं आमिरची भेट घेतली. आमिर मास्टर ब्लास्टरला आपला आदर्श मानतो. आमिर म्हणाला होता, “मी आज जिथे आहे तिथे फक्त सचिनमुळेच आहे. सचिनच माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे.”
सचिन तेंडुलकरच्या मते, आमिरनं आज जे काही मिळवलंय ते इतर कोणीही मिळवू शकत नाही. सचिन म्हणाला होता, “जेव्हा आठ वर्षांचा मुलगा अशा आघातातून सावरतो आणि आयुष्यात इतरांसाठी प्रेरणा बनतो, तेव्हा ती खूप मोठी उपलब्धी असते.” आमिर सध्या जम्मू-काश्मीरच्या पॅरा टीमचा कर्णधार आहे. तो भारतीय पॅरा संघाकडूनही क्रिकेट खेळला आहे.
वडिलांनी आत्महत्या केली, आईला कॅन्सर झाला; ‘बेझबॉल’चा पोस्टर बॉय बेअरस्टोचा 100 कसोटीपर्यंतचा प्रवास
“ही कामगिरी अद्भुत!”, क्रिकेटच्या देवानंही केलं 700 बळी घेणाऱ्या जेम्स अँडरसनचं कौतुक