गोवा : हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) अंतिम टप्प्यात प्ले-ऑफ फेरीसाठी प्रचंड चुरस असताना तळातील चेन्नईयन एफसीविरुद्ध रविवारी (२० फेब्रुवारी) सातत्य राखताना फॉर्मात असलेला जमशेदपूर एफसी अव्वल चार संघांतील स्थान आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करेल.
टिळक मैदानावर होणाऱ्या सामन्यात फॉर्मात असलेल्या जमशेदपूरचे पारडे जड आहे. जमशेदपूर एफसीने आयएसएलच्या आठव्या हंगामात चांगली कामगिरी केली आहे. १५ सामन्यांतून २८ गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये ते तिसऱ्या स्थानी आहेत. संयुक्तरित्या अव्वल स्थानी असलेले हैदराबाद एफसी आणि एटीके मोहन बागान (प्रत्येकी २९ गुण) आणि जमशेदपूर एफसीमध्ये केवळ एका गुणाचा फरक आहे. त्यामुळे संडे स्पेशल सामन्यात बाजी मारल्यास ते थेट अव्वल स्थानी झेप घेतील. तसेच सेमीफायनल प्रवेश जवळपास निश्चित करतील.
ओवेन कॉयल यांच्या प्रशिक्षकपदाखालील जमशेदपूर एफसीने मागील दोन सामन्यांत गतविजेता मुंबई सिटी एफसी आणि एटीके मोहन बागानला हरवले आहे. यंदाच्या हंगामात त्यांना सलग दुसऱ्यांदा विजयी हॅटट्रिक साधण्याची संधी आहे. रविवारी जमशेदपूरसमोर तुलनेत कमकुवत प्रतिस्पर्धी आहे. चेन्नईयन एफसीला अपेक्षित सूर गवसलंला नाही. हंगामी प्रशिक्षक साबीर पाशा यांच्या मार्गदर्शनाखाली क्लबला मागील पाच सामन्यांत विजय मिळवता आला नाही. मागील लढतीत ओदिशा एफसीला २-२ असे बरोबरीत रोखताना त्यांनी सलग दोन पराभवांची मालिका खंडित केली. वरच्या क्रमांकावरील संघाविरुद्ध उंचावलेल्या खेळामुळे चेन्नईयनचा आत्मविश्वास उंचावला आहे. त्याचा मानसिक फायदा टॉप थ्रीमधील जमशेदपूर एफसीविरुद्ध खेळताना होईल.
आमच्या खेळाडूंनी ओदिशाविरुद्ध चमक दाखवली. एफसी गोवाविरुद्ध पाच गोल खाल्ल्यानंतर कमबॅक करणे सोपे नाही. मात्र, आम्ही ओदिशाला बरोबरीत रोखले. त्यातच तीन दिवसांत दुसरी मॅच होत आहे. प्रतिस्पर्धी संघ तुल्यबळ आहे. त्यांचे आक्रमण प्रभावी आहे. बचाव सुरेख आहे. त्यामुळे आमचा कस लागेल. मात्र, प्रतिस्पर्ध्यांना रोखण्याच्या उद्देशाने आम्ही मैदानात उतरू, असे चेन्नईयनचे हंगामी प्रशिक्षक साबीर पाशा यांनी म्हटले आहे.
जमशेदपूर एफसीला आयएसएलच्या इतिहासातील पहिल्या सेमीफायनलचे वेध लागलेत. सहापैकी मागील पाच सामने जिंकून फॉर्म राखला आहे. चेन्नईयनसह पाच सामने शिल्लक असल्याने जमशेदपूरला प्ले-ऑफ फेरी गाठण्याची संधी आहे. एकाहून अनेक मॅचविनर हे त्यांच्या उंचावलेल्या कामगिरीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ग्रेग स्टीवर्टने मागील दोन सामन्यांत गोल केलेत. डॅनियल चिमा चुक्वुने मागील तीन सामन्यांत तितकेच गोल करण्यात (असिस्ट) मदत केली आहे. प्रत्येक खेळाडू सांघिक कामगिरी उंचावण्यात योगदान देत असल्याने जमशेदपूर एफसीला कुठलीही चिंता नाही. त्यातच यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नईयनवर मिळवलेला १-० विजय त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकतो.