गोवा| सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत बुधवारी वास्को येथील टिळक मैदानावर एफसी गोवा संघासमोर विजयासाठी जमशेदपूर एफसीचे आव्हान असेल.
जमशेदपूर मागील सहा सामन्यांत अपराजित आहे. ही मालिका अखंडीत रहावी त्यांचा प्रयत्न असेल. पहिल्या सामन्यात चेन्नईयीन एफसीकडून हरल्यानंतर प्रशिक्षक ओवेन कॉयल यांच्या जमशेदपूर संघाने भक्कम झुंज दिली असून सहा सामन्यांत हार पत्करलेली नाही. मागील तीन सामन्यांत एकच गोल पत्करताना त्यांनी दोन क्लीन शीट राखल्या आहेत.
खेळाडूंच्या कार्यपद्धतीचा वेग तसेच संघाने प्रदर्शित केलेली देहबोली या गोष्टी कॉयल यांच्यासाठी आनंददायक ठरल्या आहेत. कॉयल म्हणाले की, खेळाडूंनी खेळ सामन्यागणिक भक्कम केला आहे. ज्या क्षेत्रांत त्रुटी होत्या, त्या दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे. खेळाडूंनी यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. तुमच्याकडे अशा खेळाडूंचा चमू असतो तेव्हा तुम्ही चांगले निकाल साध्य करू शकता.
यंदाच्या मोसमात सर्वाधिक गोलांच्या क्रमवारीत आघाडीवर असलेल्या दोन खेळाडूंमध्येही हा मुकाबला असेल. गोव्याचा इगोर अँग्युलो आणि जमशेदपूरचा नेरीयूस वॅल्सकीस यांनी प्रत्येकी सहा गोल केले आहेत. ते त्यांच्या संघाचे तारणहार आहेत. संघाच्या गोलांमध्ये त्यांचा वाटा 75 टक्के आहे. यावरून संघ त्यांच्यावर अवलंबून असल्याचे दिसून येते.
दुखापतींच्या काही समस्या असल्या तरी ऐतोर मॉनरॉय परतल्यामुळे जमशेदपूरचा संघ आणखी भक्कम झाला आहे. मॉनरॉयचे निलंबन संपले आहे. खडतर सामन्यासाठी आपले खेळाडू सज्ज झाल्याचे कॉयल यांनी सांगितले.
कॉयल यांनी पुढे सांगितले की, दर्जेदार खेळाडू मिळणे नेहमीच चांगले असते. मॉनरॉय हा उपजत गुणवत्ता लाभलेला खेळाडू आहे. तरुण खेळाडूंसमोर तो आदर्श निर्माण करतो. पुढाकार घेण्यासाठी सज्ज असलेले इतरही अनेक खेळाडू आमच्याकडे आहेत. आघाडी फळीत आमच्यासमोर पर्याय आहेत. गोव्याचा संघ नक्कीच चांगला असून अशा चांगल्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध आम्हाला सर्वस्व पणास लावावे लागेल.
स्कॉटलंडच्या कॉयल यांनी सांगितले की, पहिल्या मिनिटापासून अखेरच्या क्षणापर्यंत आमच्या संघाला सर्वोत्तम प्रयत्न करावे लागतील. धोकादायक आव्हान निर्माण करू शकणारे काही प्रतिभाशाली खेळाडू गोव्याकडे आहेत. आम्हाला मैदानावरील आव्हानांवर मात करावी लागेल आणि प्रतिस्पर्धी संघासमोर समस्या निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
दुसरीकडे गोव्याचा संघ आतापर्यंत झगडतो आहे. बचाव ही त्यांची कमकुवत बाजू ठरली आहे. गेल्या दोन सामन्यांत त्यांना 29 शॉट््सना सामोरे जावे लागले, ज्यातील 10 टार्गेटवर होते. गोव्याला हे दोन सामने पाठोपाठ गमवावे लागले आहेत.
प्रशिक्षक जुआन फरांडो यांनी भूतकाळात अडकण्यापेक्षा आपले लक्ष्य भविष्यावर केंद्रीत केले आहे. त्यांनी सांगितले की, आमच्यादृष्टिने सर्व लक्ष वर्तमान स्थितीवर आहे आणि ही स्थिती म्हणजे जमशेदपूरविरुद्धचा सामना. पराभवांमुळे मी नक्कीच निराश आहे. आमची मानसिकता अशी आहे की एक योजना आम्ही पक्की करतो. आता ही एक योजना कोणती याचे गुपित मी उद्या सामन्यापर्यंत उघड करणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
बाबो!! चक्क मैदानावर प्रतिस्पर्ध्याच्या तोंडावर थुंकला ‘हा’ खेळाडू, झाली मोठी कारवाई; पाहा व्हिडिओ
आयएसएल २०२०: चुरशीच्या लढतीत ओदिशा-नॉर्थईस्ट बरोबरी
आयएसएल २०२०: नॉर्थईस्टविरुद्ध ओडिशाला प्रतिक्षा पहिल्या विजयाची