गोवा – जमशेदपूर एफसीने दमदार खेळ करताना इंडियन सुपर लीगमध्ये ( आयएसएल) गुरुवारी तगड्या केरला ब्लास्टर्स एफसीला हार मानण्यास भाग पाडले. जमशेदपूरने मागील सामन्यातील पराभवातून धडा घेत खेळात कमालीची सुधारणा केली. त्यात केरला ब्लास्टर्सच्या बचाव फळीतील चुकाही जमशेदपूरच्या पथ्यावर पडल्या. ग्रेग स्टीवर्टने पेनल्टीवर दोन गोल केले, तर डॅनिएल चुक्वूने एक गोल करताना जमशेदपूर एफसीचा ३-० असा विजय पक्का केला. या विजयासोबत जमशेदपूरने २५ गुणांसह थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. त्यांनी केरला ब्लास्टर्सला पाचव्या क्रमांकावर ढकलले.
जमशेदपूर एफसीने दुसऱ्या मिनिटाला सुरेख आक्रमण केला. डॅनिएल चुक्वू गोल करण्यासाठी पुढे आला, परंतु तितक्याच चपळतेने केरला ब्लास्टर्सचा गोलरक्षक प्रभसुखन गिलने तो अडवला. जेमशेदपूरचे खेळाडू आक्रमणावरच भर देताना दिसले, केरला अधुनमधून संधी मिळेल तशी आक्रमण करत गेली. जमशेदपूरच्या चुक्वूने याच आक्रमकतेत फाऊल केला आणि त्याला पिवळे कार्ड दाखवण्यात आले. आता त्याला पुढील सामन्यांत सांभाळून खेळणे भाग होते. २४व्या मिनिटाला जमशेदपूरच्या बचावफळीच्या चूकीचा फायदा उचलण्यात केरलाच्या विन्सी बरेट्टोला अपयश आले. त्याचा ऑन टार्गेट प्रयत्न जमशेदपूरचा गोलरक्षक टीपी रेहेनेशने सहज रोखला.
३८व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकवर जमशेदपूरच्या ग्रेग स्टीव्हर्टला गोल करता आला नाही. जमशेदपूरच्या आक्रमणाला केरलाचे बचावपटू तितक्यात शिताफीने सडेतोड उत्तर दिले. पण, ४४व्या मिनिटाला केरलाच्या देनेचंद्रम मैटेईने पेनल्टी क्षेत्रात ग्रेग स्टीवर्टला चुकीच्या पद्धतीने पाडले अन् जमशेदपूरला पेनल्टी मिळाली. त्यावर स्टीवर्टने गोल करून जमशेदपूरला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांचा खेळ तुल्यबळ झाला, परंतु त्या एका गोलने जमशेदपूरची बाजू वरचढ बनवली.
दुसऱ्या हाफच्या सुरूवातीला जमशेदपूरला आणखी एक पेनल्टी मिळाली आणि त्यावर स्टीवर्टने यशस्वी गोल करताना २-० अशी आघाडी मजबूत केली. ५३व्या मिनिटाला जमशेदपूरने आणखी एक गोल केला. यावेळीस बोरीस सिंगच्या पासवर चुक्वूने गोल केला. इथे केरलाचा संघ पूर्णपणे बॅकफूटवर फेकला गेला. केरलाचे आक्रमणपटू चेंडू पेनल्टी क्षेत्रात घेऊन जात होते, परंतु त्याला अंतिम स्वरूप देण्यात ते वारंवार अपयशी ठरले. केरलाच्या एड्रियन लुना, अल्व्हारो व्हॅझकिज यांना जखडून ठेवण्यात जमशेदपूरची बचावफळी यशस्वी ठरली. ८३व्या मिनिटाला फ्री किकवरून आलेल्या पासवर इशान पंडिताने हेडर लगावला, परंतु चेंडू गोलपोस्टच्या वरून गेला. केरला ब्लास्टर्सची पाटी आज कोरी राहिली.
निकाल – जमशेदपूर एफसी ३ ( ग्रेग स्टीवर्ट ४५ मि., ४८ मि., डॅनिएल चुक्वू ५३ मि. ) विजयी विरूद्ध केरला ब्लास्टर्स ०.