जपान ओपन सुपर सिरीजमध्ये भारताची स्टार महिला बॅडमिंटपटू पीव्ही सिंधू हिला पराभव स्वीकारावा लागला आहे. या सामन्यात तिला जपानच्या निजुमी ओकुहरा हिने हरवले. तिने सिंधूचा २१-१८, २१-०८ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
पहिल्या सेटमध्ये सिंधूने आश्वासक सुरुवात करत ६-२ अशी आघाडी मिळवली. या आघाडीवर सिंधू फार काळ टिकू शकली नाही. ओकुहराने सेटमध्ये पुनरागमन करताना सेट ८-८ असा बरोबरीत आणला. सेटमध्ये मिड इंटरव्हल झाला त्यावेळी सिंधू ११-१० अशी आघाडीवर होती. इंटरव्हल नंतर ओकुहराने गुण १४-११ करत सिंधूवर तीन गुणांची आघाडी मिळवली. १५-१२ अश्या पिछाडीवर गेल्यानंतर सिंधूने सलग चार गुण मिळवत १६-१५ अशी आघाडी मिळवली. सेटमध्ये पुनरागमन करताना ओकुहराने पहिला सेट २१-१८ असा जिंकला.
दुसऱ्या सेटच्या सुरुवातीलाच ओकुहराने ५-१ अशी आघाडी घेतली. सिंधूचे फटके नेटमध्ये जात असल्याने सिंधू २-८ अशी पिछाडीवर पडली. सिंधूला या सेटमध्ये लय सापडली नाही ती १४-५ अशी पिछाडीवर पडली. त्यानंतर भारतीय खेळाडूला जपानी ओकुहराने जास्त संधी दिली नाही आणि हा सेट २१-८ असा जिंकत हा सामना जिंकला.
यदाकदाचित आपणास माहिती नसेल तर
सलग दोन मोठ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणाऱ्या सिंधूला या स्पर्धेची उपांत्यफेरी देखील गाठता आली नाही. कोरिया ओपन सुपर सिरीजच्या अंतिम सामन्यात पीव्ही सिंधूने ओकुहरा हिला हरवत त्या स्पर्धेचे विजेतेपद जिकंले होते. यावेळी तिला सामना जिंकण्यात अपयश आले. या सामन्यातील विजयासह या दोन खेळाडूतील ओकुहराने आघाडी मिळवली आहे. या दोन खेळाडूंमध्ये आजपर्यंत ९ सामने झाले आहेत. त्यात ओकुहराने ५ सामने जिंकले तर सिंधूने ४ सामने जिंकले आहेत.