‘इंडिया का त्योहार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. गुरुवारी (१८ फेब्रुवारी) चेन्नईच्या ग्रँड चोला या पंचतारांतिक हॉटेलमध्ये पार पडलेल्या लिलावाने या हंगामाचा श्रीगणेशा झाला. या लिलावात सहभागी झालेल्या २९१ खेळाडूंपैकी अनेकांना कोटींच्या घरात बोली लागल्या.
काही खेळाडू आपल्या आधारभूत किंमतीसह आयपीएलचा भाग बनले. तर काहींना कुणीही खरेदीदार मिळाला नाही. अशाच एका अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूने सोशल मीडियाद्वारे आपले दुख व्यक्त केले आहे. हा खेळाडू म्हणजे, इंग्लंडचा विस्फोटक सलामीवीर जेसन रॉय.
गतवर्षी स्वत: घेतली होती आयपीएलमधून माघार
मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा धुरंधर फलंदाज जेसन हा गतवर्षी आयपीएलमध्ये खेळताना दिसला नाही. दिल्ली कॅपिटल्सचा भाग असलेल्या जेसनने वैयक्तिक कारणामुळे आयपीएल २०२० मधून माघार घेतली होती. अशात दिल्लीने त्याच्याजागी डॅनियल सॅम्सला खेळवले होते. त्यानंतर यावर्षीच्या लिलावापुर्वी त्यांनी जेसनला मुक्त केले. त्यामुळे १ कोटींच्या आधारभूत किंमतीसह तो आयपीएल २०२१च्या लिलावात उतरला होता. परंतु त्याच्यावर बोली लावण्यात कोणत्याही संघाने रस न दाखवल्याने तो अनसोल्ड राहिला.
व्यक्त केली निराशा
यानंतर आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे ट्विट करत त्याने निराशा व्यक्त केली आहे. त्याने लिहिले आहे की, ‘यंदा आयपीएलचा भाग नसणे ही माझ्यासाठी खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. मी त्या खेळाडूंना शुभेच्छा देऊ इच्छितो, ज्यांची यावर्षी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, त्या खेळाडूंना ज्यांवर मोठी बोली लागली. आता त्या महागड्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळताना पाहायला खूप मजा येणार आहे.’
Massive shame not to be involved in the @IPL this year but wanted to congratulate all the lads that did get picked up. Especially some of the high rollers. Going to be good to watch 👊🏼
— Jason Roy (@JasonRoy20) February 18, 2021
आयपीएलच्या एका सामन्यात केल्या होत्या ९१ धावा
भलेही जेसन रॉयला इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणले जात असले तरी त्याची आयपीएल कारकिर्द जास्त प्रभावी राहिली नाही. २०१७ साली गुजरात लायन्स संघातून त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. यानंतर अवघे ८ सामने खेळताना त्याने १७९ धावा केल्या. यात ९१ धावांच्या सर्वोच्च खेळीचा समावेश आहे. २०१८ मध्ये त्याने अखेरचा आयपीएल सामना खेळला होता.
महत्त्वाच्या बातम्या-