टी-२० विश्वचषकातील ३७ व्या सामन्यात शुक्रवारी (५ नोव्हेंबर) भारत आणि स्कॉटलंड संघ एकमेकांशी भिडले. या सामन्यात स्कॉटलंड संघ भारतीय संघासमोर पूर्णपणे शरण आल्याचे पाहायला मिळाले. भारताने या सामन्यात आठ विकेट्स राखून मोठा विजय मिळवला. भारतीय संघाने अवघ्या ६.३ षटकात हा विजय मिळवला आहे. भारताने प्रथम गोलंदाजी आणि नंतर फलंदाजी दोन्हीमध्ये अप्रतिम प्रदर्शन केले, ज्यामुळे हा विजय संघाला सहज मिळाला. गोलंदाज जसप्रीत बुमराहने या सामन्यात दोन विकेट्स घेतल्या असून स्वत:च्या नावावर एका नवीन विक्रमाची नोंद केली आहे.
बुमराह या सामन्यात ३.४ षटके गोलंदाजी केली आणि अवघ्या १० धावा देऊन दोन विकेट्सही मिळवल्या. बुमराहने या सामन्यात मिळवलेल्या दोन विकेट्सच्या मदतीने हा नवीन विक्रम केला आहे. बुमराहने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने हा विक्रम करून फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलला मागे टाकले आहे.
युजवेंद्र चहल टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये भारतासाठी आतापर्यंत ६३ विकेट्स घेतल्या आहेत. तर बुमराहाने नामिबियाविरुद्ध दोन विकेट्स घेतल्यानंतर एकूण ६४ विकेट्ससह या यादीत पहिले स्थान मिळवले आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा घेणारे गोलंदाज
१. जसप्रीत बुमराह – ६४ विकेट्स
२. युजवेंद्र चहल – ६३ विकेट्स
३. रविचंद्रन अश्विन – ५५ विकेट्स
४. भुवनेश्वर कुमार – ५० विकेट्स
५ – रवींद्र जडेजा – ४३ विकेट्स
दरम्यान, भारत आणि स्कॉटलंडमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्कॉटलंड संघ प्रथम फलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांसमोर १७.४ षटकांमध्ये सर्वबाद झाला. स्कॉटलंडने यादरम्यान अवघ्या ८५ धावा केल्या.
प्रत्युत्तरात भारतीय संघाच्या सलामीवीरांनी जबरदस्त फलंदाजीचे प्रदर्शन करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी सलामीवीर जोडीने ७० धावा केल्या. रोहित शर्माने १६ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३० धावा केल्या आणि बाद झाला. केएल राहुलने १९ चेंडूत सर्वाधिक ५० धावांची खेळी केली. यामध्ये त्याच्या सहा चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे.
गोलंदाजीमध्येही भारताने कमाल केली. मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी १५ धावा दिल्या आणि प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. बुमराहने दोन विकेट्स आणि रविचंद्रन अश्विनेही एक विकेट घेतली. भारताने मिळवलेल्या या विजयानंतर गुणतालिकेत फेरबदल पाहायला मिळाला आहे. ग्रुप दोनमध्ये भारतीय संघने अफगाणिस्तानला मागे टाकले आणि तिसरे स्थान गाठले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताचा कर्णधार विराट १८ नंबरची जर्सी का घालतो? कारण आहे खूपच भावूक
विराट कोहलीने जेव्हा गोलंदाजांची पळता भूई थोडी केली होती, वाचा ५ सर्वोत्तम खेळींबद्दल सविस्तर