आयपीएल २०२० मध्ये आत्तापर्यंत १९ सामने झाले असून, हे सर्व सामने रोमांचक झाले आहेत. कधी फलंदाजांचे तर कधी गोलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. तसेच आत्तापर्यंत काही खास विक्रमही या हंगामात नोंदवले गेले. असाच एक चांगला आणि एक नकोसा विक्रम जसप्रीत बुमराहच्या नावावर झाला आहे.
यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा १९ सामन्यांनंतर सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने आत्तापर्यंत २० षटके गोलंदाजी केली आहे. यात ५५ चेंडू त्याने निर्धाव टाकले आहेत.
याबरोबरच यंदा १९ सामन्यांनंतर बुमराहच्या गोलंदाजीवरच फलंदाजांनी सर्वाधिक षटकारही मारले आहेत. त्याच्या गोलंदाजीवर एकूण ११ षटकार फलंदाजांनी खेचले आहेत. या नकोशा यादीत रविंद्र जडेजाही त्याच्याबरोबर संयुक्तरिक्या अव्वल क्रमांकावर आहे. त्याच्याही गोलंदाजीवर ११ षटकार मारण्यात आले आहेत.
याबरोबरच सर्वाधिक चौकार मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर फलंदाजांनी मारले आहेत. त्याच्या गोलंदाजीवर एकूण २१ चौकार मारण्यात आले आहेत.
तसेच आयपीएलमध्ये १९ सामन्यांपर्यंत सर्वाधिक एकेरी धावा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर काढण्यात आल्या आहेत. त्याच्या गोलंदाजीवर ५६ एकेरी धावा फलंदाजांनी घेतल्या आहेत. तर सर्वाधिक वेळा दुहेरी धावा दिपक चाहरच्या गोलंदाजीवर काढण्यात आल्या आहेत. त्याच्या गोलंदाजीवर १४ वेळा दुहेरी धावा फलंदाजांनी काढल्या आहेत. तसेच एन्रीच नॉर्किए आणि खलील अहमद यांच्या गोलंदाजीवर फलंदाजांनी प्रत्येकी ३ वेळा तिहेरी धावा घेतल्या आहेत.