अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे शनिवारी (०१ मे) मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएल २०२१ चा सत्ताविसावा सामना झाला. या रोमांचक लढतीला मुंबईचा अष्टपैलू कायरन पोलार्ड याने आणखीनच रंगत चढवली. त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे मुंबईने ४ विकेट्सने चेन्नईला पराभूत केले. परंतु मुंबईचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने या सामन्यात अतिशय महागडी गोलंदाजी केली.
आपल्या घातक गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा बुमराह या सामन्यात मात्र चेन्नईच्या फलंदाजांचा सपाटून मार खाताना दिसला. त्याच्या ४ षटकात चेन्नईच्या फलंदाजांनी तब्बल ५६ धावा कुटल्या. त्याचे पहिले षटक दमदार राहिले. या षटकात त्याने फक्त ८ धावा दिल्या. परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात त्याने अनुक्रमे १७ आणि २१ धावा दिल्या. तसेच चौथ्या षटकात १० धावा देत त्याने एकूण ५६ धावा खर्च केल्या. दरम्यान त्याला मोईन अलीची एकमेव विकेट घेता आली.
ही बुमराहच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात वाईट कामगिरी ठरली. २०१३ पासून आयपीएलचा भाग असलेल्या बुमराहने यापुर्वी एका सामन्यात सर्वाधिक ५५ धावा खर्च केल्या होत्या. २०१५ साली दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याने ही नकोशी कामगिरी केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच चेन्नईविरुद्ध त्याने सर्वाधिक ५६ धावा लुटल्या आहेत.
आयपीएलच्या एका सामन्यात बुमराहने दिलेल्या सर्वाधिक धावा
५६ धावा- विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (दिल्ली, २०२१)
५५ धावा- विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (दिल्ली, २०१५)
५२ धावा -विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (मुंबई, २०१५)
४५ धावा- विरुद्ध गुजरात लायन्स (मुंबई, २०१७)
बुमराहला आयपीएल इतिहासातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदजांमध्ये गणले जाते. आतापर्यंत आयपीएलमध्ये ९९ सामने खेळताना त्याने ११५ विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान १४ धावांवर ४ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मनात संतोष अन् डोळ्यात आनंदाश्रू! थरारक विजयानंतर पोलार्डने देवाचे मानले आभार, पाहा तो भावुक क्षण
वन मॅन आर्मी! एकटा पॉलार्ड बलाढ्य सीएसकेला पडला भारी, ‘या’ विक्रमात रोहित-रैनालाही सोडले पिछाडीवर