विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रविवारी (८ ऑगस्ट) समाप्त झाला. भारतीय संघाला विजयाची संधी असताना अखेरच्या दिवशी पावसामुळे एकही षटकांचा खेळ झाला नाही व सामना अनिर्णित राहिला. मात्र, भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने केलेली गोलंदाजी भारतीय संघासाठी सर्वात मोठी सकारात्मक बाब राहिली. दुसऱ्या लॉर्डस् कसोटीत त्याला एक मोठा विक्रम नोंदविण्याची संधी असेल.
या विक्रमाची बुमराहला संधी
जसप्रीत बुमराहने नॉटिंघम कसोटीत शानदार गोलंदाजी करत इंग्लंडच्या नऊ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यासह बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या बळींचा आकडा ९२ वर नेला. बुमराहने आतापर्यंत केवळ २१ कसोटी सामने खेळले आहेत. तो ज्या वेगाने प्रगती करत आहे, ते पाहता दुसऱ्या लॉर्ड्स कसोटीत ऑस्ट्रेलियाचे महान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा आणि शेन वॉर्नचा विक्रमही तोडू शकतो. तसेच, भारताचा माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझाच्या विक्रमाची बरोबरी करण्याची त्याच्याकडे संधी आहे.
बुमराहला कसोटी क्रिकेटमध्ये १०० बळी पूर्ण करण्यासाठी फक्त ८ बळींची गरज आहे. जर त्याने त्याच्या २२ व्या सामन्यात हे बळी मिळवले, तर तो भारतीय फिरकीपटू प्रज्ञान ओझाच्या कामगिरीची बरोबरी करेल. ओझाने २२ कसोटीत आपले १०० कसोटी बळी पूर्ण केले होते. यासह, तो मॅकग्रा आणि शेन वॉर्नला मागे टाकेल ज्यांनी २३ व्या कसोटीत आपले १०० बळी पूर्ण केलेले.
या खेळाडूंच्या नावे जमा आहे सर्वात जलद १०० बळी
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० घेण्याचा विक्रम ग्रॅहम लोहमन यांच्या नावावर आहे. इंग्लंडच्या या गोलंदाजाने फक्त १६ कसोटीत १०० बळी घेतले होते. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचे टर्नर, इंग्लंडचे बार्न्स, ऑस्ट्रेलियाचे क्लॅरी ग्रिमट आणि पाकिस्तानचा यासीर शाह आहेत. ज्यांनी प्रत्येकी १७ कसोटीत १०० बळी मिळवलेले. भारतासाठी माजी कर्णधार व दिग्गज लेगस्पिनर अनिल कुंबळे यांनी ३१ कसोटीत १०० बळी घेण्याचा विक्रम केला आहे. बुमराहकडे आता या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येण्याची संधी असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडने ‘या’ २ शतकवीरांना प्लेइंग इलेव्हनमध्ये द्यावी संधी, माजी कर्णधाराचा सल्ला
तमिळनाडूचा माजी कर्णधार भूषवणार निवड समितीचे अध्यक्षपद, बीसीसीआय घेणार मोठा निर्णय?
“ऑरेंज कॅप सर्वात निरर्थक पुरस्कार”, दिग्गज भारतीय खेळाडूचे मोठे विधान