टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं आपल्या धडाकेबाज गोलंदाजीनं ऑस्ट्रेलियात खळबळ उडवून दिली आहे. गाबा येथील तिसऱ्या कसोटीत बुमराहनं मिचेल स्टार्कची विकेट घेत ऑस्ट्रेलियात 50 बळी पूर्ण केले. भारतासाठी अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसरा गोलंदाज आहे.
ऑस्ट्रेलियात बुमराहच्या आधी फक्त एकच भारतीय गोलंदाज 50 बळी घेण्यात यशस्वी ठरला आहे. हा गोलंदाज म्हणजे महान कपिल देव. कपिल देव यांनी आपल्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर सर्वाधिक 51 विकेट घेतल्या होत्या. बुमराह आता कपिल देवचा हा विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे. सध्याच्या भारतीय संघात जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज पाहिला तर, फिरकीपटू आर अश्विन टॉप 5 मध्ये आहे. या यादीत अश्विन 40 विकेट्ससह चौथ्या स्थानावर आहे.
जसप्रीत बुमराह गाबा कसोटीत भारताचा एकमेव योद्धा आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या 8 पैकी 6 विकेट बुमराहच्या नावावर होत्या. यादरम्यान त्यानं ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि नॅथन मॅकस्विनी तसेच स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श आणि मिचेल स्टार्क यांच्या विकेट घेतल्या.
भारतानं पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला 445 धावांत गुंडाळलं. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडच्या शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला एवढी मोठी धावसंख्या गाठण्यात यश आलं आहे. जसप्रीत बुमराहशिवाय मोहम्मद सिराजला 2 तर आकाशदीप आणि नितीश रेड्डीला प्रत्येकी 1 बळी मिळाला.
ऑस्ट्रेलियात सर्वाधिक कसोटी विकेट घेणारे भारतीय
कपिल देव – 51
जसप्रीत बुमराह – 50
अनिल कुंबळे – 49
आर अश्विन – 40
बिशन सिंग बेदी – 35
हेही वाचा –
फॅब 4 च्या शर्यतीत खूप मागे पडला ‘किंग’, एकेकाळी होतं निर्विवाद वर्चस्व!
वारंवार तेच! विराट कोहलीची पुन्हा तीच चुकी, अत्यंत खराब शॉट खेळून बाद
जसप्रीत बुमराहबाबत वादग्रस्त वक्तव्य, इंग्लिश कमेंटेटरनं मागितली माफी; संपूर्ण प्रकरण जाणून घ्या