भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात १७ डिसेंबरपासून ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. तत्पुर्वी १३ डिसेंबरपर्यंत दोन्ही संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या दिवसरात्र सराव सामन्याची आज (११ डिसेंबर) सिडनी येथे सुरुवात झाली आहे. या सराव सामन्याच्या पहिल्याच दिवशी फार क्वचित पाहायला मिळणारी गोष्ट घडली. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने या सामन्यात त्याची दमदार फटकेबाजी करण्याची प्रतिभा दाखवली आहे.
या सामन्यात बुमराहने १०व्या क्रमांकावर फलंदाजीला येत ५७ चेंडूत नाबाद ५५ धावा केल्या. दरम्यान त्याने ६ चौकार आणि २ षटकार लगावले. एवढेच नव्हे तर, त्याने १०व्या विकेटसाठी ७१ धावांची भागिदारीही साकारली. यासह बुमराहने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील पहिले अर्धशतक नोंदवले आहे. बुमराहच्या या खेळीला नावाजण्याचे अजून एक कारण म्हणजे, या सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने मिळून १९४ धावा केल्या आहेत. यात एकट्या बुमराहच्या सर्वाधिक ५५ धावांचा समावेश आहे.
बुमराहच्या तुफानी फलंदाजीला पाहता आता माजी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रासोबत त्याची तुलना केली जाऊ लागली आहे. मॅकग्राने काही वर्षांपुर्वी न्यूझीलंड संघाविरुद्ध शानदार अर्धशतकी खेळी केली होती.
भारत-ऑस्ट्रेलिया ‘अ’ सराव सामन्याची आकडेवारी
सिडनी येथे चालू असलेल्या सराव सामन्यात नाणेफेक जिंकत भारतीय संघाने प्रथम फलंदाजी निवडली होती. मात्र अपेक्षेप्रमाणे त्यांना सुरुवात करता आली नाही. बुमराहव्यतिरिक्त केवळ २ भारतीय फलंदाज ४० पेक्षा जास्त धावा करु शकले. यात युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल यांचा समावेश आहे. शॉ याने प्रथम फलंदाजीला येत २९ चेंडूत ४० धावा केल्या. तर गिलने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ५८ चेंडूत ४३ धावा केल्या.
मात्र पुढे भारतीय फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. मयंक अगरवाल, हनुमा विहारी, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत आणि वृद्धिमान साहा यांसारखे फलंदाज २०पेक्षा जास्त धावा करु शकले नाहीत. पण शेवटी मोहम्मद सिराज (२२ धावा) आणि जसप्रीत बुमराहने मिळून संघाची धावसंख्या १९४ पर्यंत पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला.
संबंधित बातम्या-
INDvsAUS: दुसऱ्या सराव सामन्यात विराट- पुजारा यांच्या अनुपस्थितीमुळे भारताची अवस्था ‘दयनीय’
…म्हणून स्मिथने करावे ऑस्ट्रेलियाचे नेतृत्त्व; माजी दिग्गजाने सांगितले कारण
‘या’ सवयीचा व्हायचा फायदा; मास्टर ब्लास्टरने सांगितले नाबाद द्विशतकामागचे गुपित