भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबाबत प्रसार माध्यमांवर गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा सुरू आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या अखेरच्या सामन्यात बुमराहच्या पाठीला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला भर सामन्यात स्कॅनसाठी रुग्णालयात जावं लागलं होते. यानंतर त्यानं संपूर्ण सामन्यात गोलंदाजी केली नाही.
आता प्रसार माध्यमांमध्ये बुमराच्या फिटनेस संदर्भात अनेक बातम्या येत आहेत. अनेक रिपोर्टमध्ये दावा केला जात होता की, बुमराहला ‘बेड रेस्ट’चा सल्ला देण्यात आला आहे. यावर आता बुमराहनं प्रतिक्रिया देत या सर्व दाव्यांचा समाचार घेतला. बुमराह म्हणाला की, “तुमच्यासाठी खोट्या बातम्या पसरवणं सोपं आहे”. त्याच्या या प्रतिक्रियेवरून स्पष्ट समजून येतं की, बुमराहला कोणताही बेड रेस्टचा सल्ला देण्यात आलेला नाही.
जसप्रीत बुमराह फेब्रुवारी मध्ये खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकण्याची शक्यता असल्याचा दावा अनेक रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. मात्र त्याच्या फिटनेस संदर्भात बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही. आता त्यानं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही कमेंट करत सर्व अफवांना उत्तर दिलं. जसप्रीत बुमराहनं बॉर्डर-गावस्कर मालिकेत सर्वाधिक 32 विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय त्यानं मालिकेत कर्णधार रोहित शर्मा पेक्षा अधिक धावा केल्या. या कामगिरीसाठी त्याला मालिकाविराचा पुरस्कार मिळाला.
येत्या 22 जानेवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात मर्यादित षटकांची मालिका सुरु होणार आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यात 5 टी20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळले जातील. टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा 11 जानेवारीला करण्यात आली असून या मालिकेसाठी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. आता एकदिवसीय मालिकेसाठी त्याला संघात स्थान दिलं जातं की नाही याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
हेही वाचा –
भारतीय संघासाठी आनंदाची बातमी! तीन महिन्यानंतर मैदानावर परतला स्टार खेळाडू
रिषभ पंत रणजीमध्ये करणार दिल्लीचं नेतृत्व, कोहली खेळणार की नाही?
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवा प्रशिक्षक? बीसीसीआय मोठा बदल करण्याच्या तयारीत