सिडनी येथे झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं दमदार विजय मिळवला. यासह कांगारूंनी ही मालिका 3-1 अशी जिंकली. पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिला सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवला होता. परंतु त्यानंतरच्या चार सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा दबदबा पाहायला मिळाला.
या मालिकेत भारतीय फलंदाजाबरोबरच गोलंदाजांनीही निराशा केली. जसप्रीत बुमराह हा एकमेव खेळाडू होता, जो योद्ध्याप्रमाणे लढत राहिला. बुमराहनं या मालिकेत चमकदार कामगिरी करत 32 विकेट घेतल्या. या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सनंही या मालिकेत 25 विकेट्स घेण्याबरोबरच 159 धावा केल्या. परंतु जसप्रीत बुमराहला मालिकावीराचा पुरस्कार दिला गेला नसता तर तो अन्यायकारक ठरला असता.
सिडनी कसोटीत 10 बळी घेणाऱ्या स्कॉट बोलंडला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. बोलंडनं पहिल्या डावात 6 तर दुसऱ्या डावात 4 बळी घेतले. त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे भारताला दोन्ही डावात एकदाही 200 धावांचा टप्पा गाठता आला नाही.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियानं पहिल्या डावात केवळ 185 धावा केल्या. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियन संघही 181 धावाच करू शकला. पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केलं होतं. मात्र बुमराहच्या दुखापतीमुळे टीम इंडियाची गाडी रुळावरून घसरली. भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावातही निराशा केली आणि संघ 157 धावांत गडगडला. रिषभ पंतच्या 33 चेंडूत 61 धावांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर भारताला ही धावसंख्या गाठता आली. अन्यथा संघ 100च्या आतच रोखला गेला असता. ऑस्ट्रेलियानं 162 धावांचं लक्ष्य 6 गडी राखून गाठलं आणि मालिका 3-1 ने जिंकली.
हेही वाचा –
सिडनी कसोटीत टीम इंडियाचा पराभव का झाला? 5 मोठी कारणं जाणून घ्या
भारताचे पानिपत! ऑस्ट्रेलियाने 10 वर्षांनंतर जिंकली बॉर्डर-गावस्कर मालिका
तिसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी गुलाबी जर्सी का घातली? जाणून घ्या सिडनी ‘पिंक’ कसोटीचा इतिहास