क्रिकेटविश्वातील बलाढ्य संघांमध्ये गणला जाणारा भारतीय संघ सध्या आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ मध्ये मात्र साजेसे प्रदर्शन करण्यात अपयशी ठरतो आहे. सुपर १२ फेरीतील पहिल्याच सामन्यात त्यांना पाकिस्तानने १० विकेट्सने पराभूत केले होते. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही भारताला ८ विकेट्सने दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सलग २ सामन्यांमधील पराभवांनंतर भारतीय संघाचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग कठीण झाला आहे.
अशातच आता भारतीय संघाच्या या सलग २ पराभवांविषयी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने आश्चर्यकारक खुलासा केला आहे. सलग ६ महिने कुटुंबीयांपासून दूर राहणे आणि सातत्याने क्रिकेट खेळणे अवघड असल्याचे त्याने म्हटले आहे.
जसप्रीत बुमराहचे पूर्ण वक्तव्य
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर बोलताना बुमराह म्हणाला की, “तुम्हाला बऱ्याचदा सुट्टीची आवश्यकता असते. तुम्ही तुमच्या कुटुंबाला सतत मिस करत असता. परंतु भारतीय खेळाडू गेले ६ महिने सातत्याने क्रिकेट खेळत आहेत. याचा कुठे ना कुठे आमच्या डोक्यावर परिणाम होतो आहे. पण आम्ही प्रत्यक्षात मैदानावर असताना या गोष्टी आमच्या डोक्यात नसतात. पण तुम्ही प्रत्येक गोष्ट नियंत्रणात नाही ठेवू शकत. बायो बबलमध्ये राहाणे आणि आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहाणे, तेही इतक्या दीर्घ कालावधीसाठी. यामुळे खेळाडूंच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.”
तसेच भारतीय खेळाडूंच्या प्रदर्शनाविषयी बोलताना बुमराह म्हणाला की, “एकदा जर तुम्ही नाणेफेक गमावली तर दुसऱ्या डावात खेळपट्टी पूर्णपणे बदलते. त्यामुळे आम्हाला वाटते की, आम्ही गोलंदाजांना थोडा वाव दिला पाहिजे. आमची फलंदाजांसोबत याबाबतच चर्चा झाली होती. आम्ही खूप लवकरच आक्रमक झालोत आणि त्यातही मैदानाची सीमारेषा खूप दूर असल्याने आमच्यापुढील समस्या वाढल्या. न्यूझीलंडने हळूवार चेंडूंचा शानदार वापर केला. त्यांनी खेळपट्टीचाही चांगला उपयोग करुन घेतला आणि आमच्या फलंदाजांना मोठे फटके खेळणे अवघड बनवले. आम्हाला साधारण १-२ धावाही घेता येत नव्हत्या.”
महत्त्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडविरुद्ध सूर्यकुमार यादवला का ठेवले गेले प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर? कारण आहे चिंताजनक
भारतीय संघाचे ‘तारे जमीन पर’, संतप्त चाहत्यांनी विराट आणि संघासहित मेन्टॉर धोनीवर काढली भडास
एकच, पण सॉलिड मारला! रोहितच्या गगनचुंबी षटकाराला पाहून खुलली चाहतीची कळी, वाजवल्या टाळ्या