जसप्रीत बुमराह सध्या तुफान फार्मात आहे. गुजरातविरुद्ध आयपीएल 2024 च्या पहिल्या सामन्यात त्यानं 3 विकेट घेतल्या. या सामन्यात बुमराहनं ऋद्धिमान साहा, साई सुदर्शन आणि डेव्हिड मिलर यांना आपला बळी बनवलं. मुंबईच्या या वेगवान गोलंदाजानं सामन्यातील 4 षटकात केवळ 14 धावा दिल्या होत्या. आता बुमराह आयपीएलच्या एका मोठ्या विक्रमाकडे वाटचाल करत आहे. या विक्रमासाठी त्याला फक्त 2 बळींची आवश्यकता आहे.
दुखापतीमुळे बुमराह आयपीएलच्या मागील हंगामात खेळू शकला नाही. अन्यथा त्यानं 2023 मध्येच हा विक्रम आपल्या नावे केला असता. आता 2024 च्या आयपीएलमध्ये तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. अशा स्थितीत तो यावर्षी हा विक्रम करेल हे नक्की. मुंबईचा पुढील सामना बुधवार (27 मार्च) सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे.
बुमराहनं हैदराबादविरुद्धच्या सामन्यात दोन बळी घेतल्यास, तो एका आयपीएल फ्रँचायझीसाठी 150 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरेल. आतापर्यंत बुमराह आयपीएलमध्ये फक्त मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. तो 2013 मध्ये मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आणि अजूनही तो संघाचा भाग आहे.
बुमराहनं आतापर्यंत मुंबईसाठी 121 सामने खेळले. या सामन्यांच्या 121 डावांमध्ये गोलंदाजी करताना त्यानं 22.93 ची सरासरी आणि 7.36 च्या इकॉनॉमीनं 148 बळी घेतले आहेत. या दरम्यान 5/10 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली.
याशिवाय जसप्रीत बुमराह आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा तीन बळी घेणारा गोलंदाज आहे. अहमदाबादमध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात त्यानं हा टप्पा गाठला होता.
आयपीएलच्या इतिहासात एका संघाकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम मुंबईचाच माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या नावावर आहे. श्रीलंकेचा हा वेगवान गोलंदाज त्याच्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीत फक्त मुंबई इंडियन्सकडून खेळला. त्यानं आपल्या कारकिर्दीत 122 सामन्यात 170 विकेट घेतल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचा सुनील नरेन या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानं केकेआरसाठी 163 सामन्यात 164 विकेट घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्या सामन्यातील पराभवानंतर मुंबईला आणखी मोठा धक्का, सूर्यकुमार यादव दुसऱ्या सामन्यातूनही बाहेर
जुनं ते सोनं! क्रिकेटपटू ते समालोचक अन् आता फिनिशर; अशी आहे दिनेश कार्तिकची कारकीर्द
प्रतीक्षा संपली! बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचं वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधी आणि कुठे होणार आयोजन