कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर भारताचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सौरव गांगुली यांच्या बॅटची पुन्हा एकदा चमक दिसली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) शनिवारी होणार्या बाराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी ईडन गार्डन्सवर बीसीसीआय प्रेसिडेंट इलेव्हन आणि बीसीसीआय सेक्रेटरी इलेव्हन यांच्यात एक प्रदर्शनीय सामना खेळला गेला. यामध्ये बोर्ड अध्यक्ष गांगुली संघाला सचिव जय शाह यांच्या संघाकडून एका धावेने पराभव पत्करावा लागला.
एजीएमच्या एक दिवस आधी, ईडन गार्डन्सवर १५-१५ षटकांचा एक प्रदर्शनीय सामना आयोजित करण्यात आला होता. या सामन्यात भारताचे माजी कर्णधार गांगुली आपल्या संघासाठी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आले होते. त्यांनी २० चेंडूत ३५ धावा केल्या. यातील २८ धावा ६ चेंडूत २ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने केल्या गेल्या. सामन्याच्या नियमांनुसार त्यांना निवृत्त व्हावे लागले.
दुसरीकडे, गांगुली यांच्यासमोर बीसीसीआयचे सचिव शाह यांनी आपल्या फिरकी गोलंदाजीने चमत्कार केला. त्यांनी सात षटकांत ५८ धावांत तीन बळी घेतले. यामध्ये त्यांनी भारताचे माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज मोहम्मद अझरुद्दीनला यांना दोन धावांवर पायचित पकडले. गोवा क्रिकेट असोसिएशनचे सूरज लोटलीकर यांनाही शहा यांनी बाद केले.
तत्पूर्वी, फलंदाजी करताना बीसीसीआय सेक्रेटरी इलेव्हनने अरुण धुमल (३६) आणि जयदेव शहा (४०) यांच्यातील ९२ धावांच्या भागीदारीच्या जोरावर निर्धारित १५ षटकात तीन बाद १२८ धावा केल्या. अझरुद्दीन आणि गांगुली यांनी नव्या चेंडूने एकत्र गोलंदाजी केली. गांगुली यांनी तीन षटकांत १९ तर अझरुद्दीन यांनी दोन षटकांत आठ धावा दिल्या. प्रत्युत्तरात गांगुली यांचा संघ केवळ १२७ धावा करू शकला. गांगुली यांच्या संघाला शेवटच्या २ षटकात १४ धावांची गरज होती. मात्र, त्यांना केवळ १२ धावा करता आल्या.